Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil News: आमच्या आनंदात विष कालवण्याचे काम केले. आमच्या लेकराच्या काळजावर यांनी आरक्षण न देऊन वार केले. आमच्या हातातोंडाशी आलेला घास होता. सूड भावनेने आमच्या सगळ्या म्हणण्यावर वार केला. देवेंद्र फडणवीस यांना काहीही अधिकार नसताना आमच्या लेकरांच्या त्रास दिला. जाता जाता आम्हाला खुन्नस देऊन आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. पण मराठ्यांना काही आरक्षण दिले नाही. सरकारची वाट लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन रात्री उशिरा मुस्लिम धर्मगुरू तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल दोन तास झाली चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सज्जाद नोमानी हे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक वाटले म्हणून त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांना दोन-तीन दिवसांचा वेळ हवा आहे. दोन-तीन दिवसांत ते काय निर्णय घेणार हे लक्षात येईल. त्यांचे राज्यभरातील धर्मगुरू आहेत. त्यांच्याशी चर्चा करून ते कळवतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले होते.
आरक्षण कसे देत नाही ते बघूच
मराठा आरक्षणाची निवडणुकीबाबत भूमिका काय राहणार याबाबत बैठक असून बैठकीतच निर्णय घेईन. आरक्षण कसे देत नाही ते बघूच. मला आता देणे घेणेच काय कोणाशी? सरकारने आमची घर उन्हात बांधली आहेत. महाविकास आघाडी, महायुती त्यांना सत्तेत बसायचे आहे. त्यांना मारामाऱ्या भांडण लावायचे आहेत. योजना आणायच्या. त्यांच्या या क्रूरपणाचा शेवट मराठे करणार. आमची भूमिका बैठकीत ठरवू, असे मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी अनेक राजकीय तज्ज्ञ, अभ्यासक आणि वकिलांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत आताचे राजकारण तसेच भविष्यातील भूमिका यावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील लोकसभेप्रमाणे विधानसभेला पाडापाडीच्या राजकाणाची भूमिका घेऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. मराठा फॅक्टरला दलित आणि मुस्लीम समाजाची साथ मिळाल्याचे लोकसभेत दिसून आले. विधानसभेत जरांगे पाटील उभे ठाकले अथवा त्यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिला. तर त्यांच्या मागे हे तीनही समाज एकगठ्ठा उभा राहिला, तर राज्यातील चित्र बदलू शकते, असा कयास बांधला जात आहे.