निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 01:42 PM2024-11-21T13:42:29+5:302024-11-21T13:44:03+5:30
जर महाविकास आघाडीच्या बाजूने कल आला किंवा अपक्षांची गरज भासली तर कोण मविआच्या बाजूने उभे राहू शकेल याचा आढावा घेतला जाणार आहे
मुंबई - विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडलं असून यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात कुणाचं सरकार येणार यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुती पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार असून त्यानंतरची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत निकालावर चर्चा, त्याशिवाय काही अपक्ष आणि बंडखोरांनाही संपर्क साधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
दुपारी ३ वाजता ही बैठक होणार असून यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते हजर असणार आहेत. निकालानंतर कुठलाही धोका होऊ नये यादृष्टीने बैठकीत चर्चा होणार आहे. सर्व पर्यायांची चाचपणी करण्याकडे महाविकास आघाडीचा कल आहे. त्यात प्रामुख्याने इतर पक्ष, अपक्ष आणि बंडखोर यांच्याशी संपर्क साधण्याची चर्चा सुरू झाली आहे. विजयाची शक्यता असणाऱ्या काही अपक्ष उमेदवारांना मविआ नेत्यांकडून फोन करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेसाठी काय गरज पडू शकते, काय काळजी घ्यावी लागेल याची चर्चा बैठकीत होणार आहे. जर महाविकास आघाडीच्या बाजूने कल आला किंवा अपक्षांची गरज भासली तर कोण मविआच्या बाजूने उभे राहू शकेल याचा आढावा घेतला जाणार आहे.
महायुतीतही राजकीय हालचाली
राज्यात मतदान संपल्यानंतर बुधवारी रात्री भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी फडणवीस यांनी सुमारे २० मिनिटे चर्चा केली. सद्य:स्थितीतील राजकीय चित्र, २३ नोव्हेंबरनंतरची राजकीय समीकरणे आदींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे २५ मिनिटांनंतर फडणवीस तेथून रवाना झाले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची कुठलीही अधिकृत माहिती संघाकडून देण्यात आलेली नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने विविध कयास लावण्यात येत आहेत.
दरम्यान, राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार येईल असा विश्वास महायुतीचे नेते वर्तवत आहे. त्यात मुख्यमंत्रिपदी कोण यावरून अनेक दावे करण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं विधान केले तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केले आहे.