डोंबिवली - फोडाफोडीचं राजकारण मी अनेक वर्ष पाहतोय. त्याचे आद्य शरद पवार आहेत परंतु आज राज्यात पक्ष पळवले जातात. चिन्ह पळवली जातायेत. ज्या महाराष्ट्राकडे सुसंस्कृत म्हणून पाहिले जाते त्याची ही दशा...महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार करायचा आहे का...? असं सांगत मनसे प्रमुख राज ठाकरेंनीएकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.
डोंबिवली येथे मनसेची पहिली जाहीर सभा पार पडली. त्यात राज ठाकरे म्हणाले की, गद्दारी केलेले लोक मी पाहिलेत. १९९१-९२ पासून पाहिले. आज कुणाला लाज वाटत नाही. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला. मतांचा अपमान करून जर तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच या महाराष्ट्राला वाचवो. कुणी कुणाशी अभद्र युती करते. फोडाफोडीचं आद्य शरद पवार, १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९२ ला शिवसेना फोडली, २००५ ला नारायण राणे फोडले. आता फोडाफोडीचं राजकारण राहिले नाही आता पक्ष, चिन्ह ताब्यात घ्यायचं हे पहिल्यांदा बघितले. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी, ना एकनाथ शिंदेंची...ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी...माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे अपत्य शरद पवारांचे आहे असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
तसेच उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोत हिंदुहृदयसम्राट लिहिलेलं काढले. काही फोटो उर्दुत बघितले त्यात जनाब बाळासाहेब ठाकरे हे लिहिलेले होते. स्वत:च्या स्वार्थासाठी इथपर्यंत खालच्या पातळीत गेलात. विधानभवनात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण होते, सगळे आमदार बसले होते. कोण कुठल्या पक्षात हे माहिती नव्हते. तेव्हा मी बोललो होतो, बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र विधान सभा, विधान परिषदेच्या गॅलरीत लावा. आपण इथपर्यंत कुणामुळे आलो ते सगळ्या आमदारांना कळेल. पक्षाशी प्रतारणा, मतांशी प्रतारणा काही विचार नावाची गोष्टच उरली नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं.
...मग तेव्हा आक्षेप का घेतला नाही, उद्धव ठाकरेंना सवाल
२०१९ ची निवडणूक एकाबाजूला शिवसेना-भाजपा आणि त्यांच्यासमोर काँग्रेस राष्ट्रवादी अशी झाली. निकाल लागले मग सकाळचा एक शपथविधी झाला. ते लग्न १५ मिनिटांत तुटले कारण काकांनी डोळे वटारले. मग लगेच घरी आले. काका मला माफ करा...मग ज्यांच्याविरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेले. मला अमित शाहांनी अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देतो ही हमी दिली. कुठे चार भिंतीत...उद्धव ठाकरेंसमोर व्यासपीठावर नरेंद्र मोदींनी आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे सांगितले. अमित शाहांनी भाषणात सांगितले त्यावेळी आक्षेप का घेतला नाही. निकाल लागेपर्यंत कुणी काही बोलेना. २०१९ चा निकाल लागला. आमच्याशिवाय सरकार बसू शकत नाही तेव्हा यांनी पिडायला सुरूवात केली. मुख्यमंत्रिपद द्या नाहीतर आम्ही जातो. वेगळ्या विचारांची आघाडी झाली असा सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला.
...तोपर्यंत महाराष्ट्रात हे वठणीवर येणार नाहीत
४० आमदार निसटून गेले, काय ते डोंगर बोलले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. गुप्तचर नावाची गोष्ट मुख्यमंत्र्याकडे असते त्यांना थांगपत्ता नाही. हे ४० जण घेऊन जाणारे एकनाथ शिंदे तेव्हा काय म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बसणे त्यात अजित पवारांसोबत मांडीला मांडी लावून बसणे मला श्वास घेता येत नव्हता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले अचानक अजितदादा आले मांडीवर बसले. आता काही करता पण येईना. हे कोणते राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राचं भवितव्य हे...महाराष्ट्रातला तरूण काम मागतोय. शेतकरी आत्महत्या करतोय. महाराष्ट्रातला कामगार कसाबसा काम करतोय. हे असं का वागतायेत कारण जनता चिडत नाही. शांत, थंड लोण्याच्या गोळ्या प्रमाणे बसता. तुम्हाला गृहित धरलं जातं. महाराष्ट्रातील जनता काय उखडणार, पैसे फेकून मारू, हे गुलाम काय करतील. परत रांगेत उभे राहतील आम्हाला मतदान करतील हा जो समज झाला आहे तो तुम्ही मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात हे वठणीवर येणार नाही असं राज ठाकरेंनी सांगितले.
माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता
जिथं जिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्यांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करायचं आहे. गेली ५ वर्ष हा महाराष्ट्र आपण पाहतोय. काय चालू आहे, २०१९ ला ज्यांनी मतदान केले मग युती असेल नाहीतर आघाडी...पहिल्यांदा युतीत कोण होते, आता युतीत कोण आणि आघाडीत कोण याचा थांगपत्ता नाही. तुम्ही ज्यांना मत दिले ते आता कुणाकडे आहे ते पाहा. ५ वर्षांनी आज पुन्हा मतदान होतंय त्याला आपण सामोरे जातोय. कुणी कुठेही गेले तरी आमचा राजू विधानसभेत एकटा होता. माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. नाहीतर सहज माझी निशाणी घेऊन दुसरीकडे जाऊन बसला असता. माझ्या सहकाऱ्यांना असल्या गोष्टी शिवत नाही असंही राज यांनी म्हटलं.
महाराष्ट्रासाठी जागे राहा, जिवंत राहा
मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते. एकनाथ शिंदे फोटो आहे, उमेदवाराचे नाव आहे. ही लाडकी बहीण योजना आहे का? आपण कुठे चाललोत...व्यासपीठावर असे प्रकार इथले नाही. मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे. आमच्या सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जर महाराष्ट्र बर्बाद झाला तर छत्रपती शिवरायांचे नाव घेता येणार नाही. अटकेपार झेंडे फडकवणारा महाराष्ट्र व्यासपीठावर मुली नाचवणारा नाही. महाराष्ट्रासाठी जागे राहा. महाराष्ट्रासाठी जिवंत राहा असं आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केले.