कोल्हापूर - महाविकास आघाडीने अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासात खोडा घालण्याचेच काम केले, ते सरकार म्हणजे विकासाचे मारेकरी होते, त्यांना पुन्हा सत्तेची संधी देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे झालेल्या जाहीर सभेत केले. मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या राज्यातील प्रचाराचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, रिपब्लिकन नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
धनुष्यबाण हाच आमचा प्राण आहे, तो वाचवण्यासाठीच ५० आमदारांनी सत्ता सोडली. तसे आम्ही केले नसते तर बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसला विकली असती असा टोला शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना हाणला. ते म्हणाले, तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला तो खरा महाराष्ट्रद्रोह आहे. महाराष्ट्र आजही गुंतवणुकीत आणि उद्योगातही एक नंबरलाच आहे. तुम्ही काँग्रेससोबत जाऊन मविआचे सरकार स्थापन केले. त्या अडीच वर्षांत काय केले याचा हिशेब द्या.
घोषणांचा पाऊस 'यह तो ट्रेलर है...असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सरकार आल्यास काय करणार त्या घोषणांचा पाऊसच पाडला. प्रमुख दहा घोषणा त्यांनी जाहीर केल्या. आमचं ठरलंय अशी घोषणा कोल्हापुरात गाजली होती. परंतु कोल्हापुरात आता वारं फिरलंय, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीत संविधान बदलणार असा खोटा प्रचार केल्याने वेगळा निकाल लागला. परंतू यावेळेला या प्रचाराला जनता भूलणार नाही. कारण 'जबतक सुरज-चाँद रहेगा बाबासाहब तेरा संविधान रहेगा' अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले असा कांगावा मविआचे नेते करत आहेत. तुम्ही महाराष्ट्रात राहून गुजरातचे प्रमोशन करता हा महाराष्ट्र द्रोह नाही काय? महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केले. पायाभुत सुविधांचे जाळे निर्माण केले. महामंडळांची स्थापना करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विविध योजना राबवून सर्वसामान्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
आम्ही पक्ष चोरले असा आरोप करून विरोधक जनतेच्या मनांत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थारा देवू नका.- अजित पवार, उपमुख्यमंत्री
महायुतीने जाहीर केली दहा वचने ■ लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला १,५०० वरून २,१०० रुपये देणार तसेच महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करणार.■ शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२,००० वरून १५,००० रु, देण्याचे तसेच एमएसपीवर २० टक्के अनुदान देणार.■ प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देणार.■ वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला १,५०० वरून २,१०० रुपये देणार.■ जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार.■ २५ लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना रुपये १०,००० विद्यावेतन देणार.■ ४५,००० गावांत पांदण रस्ते बांधणार.■ अंगणवाडी आणि आशासेविकांना महिन्याला १५,००० रुपये वेतन आणि संरक्षण देणार.■ वीजबिलात ३० टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार.■ सरकार स्थापनेनंतर 'व्हिजन महाराष्ट्र २०२९ 'आराखडा १०० दिवसांच्या आत जाहीर करणार. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले असा कांगावा मविआचे नेते करत आहेत. तुम्ही महाराष्ट्रात राहून गुजरातचे प्रमोशन करता हा महाराष्ट्र द्रोह नाही काय? महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केले. पायाभुत सुविधांचे जाळे निर्माण केले. महामंडळांची स्थापना करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विविध योजना राबवून सर्वसामान्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीआम्ही पक्ष चोरले असा आरोप करून विरोधक जनतेच्या मनांत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थारा देवू नका. - अजित पवार, उपमुख्यमंत्री