नागपूरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; जिल्हाप्रमुखाने पक्षाला केला 'जय महाराष्ट्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 02:00 PM2024-11-03T14:00:58+5:302024-11-03T14:01:26+5:30
विदर्भातील जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा सोडण्यात आल्या, तर कामठी मतदारसंघात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख इच्छुक होते. ती जागाही काँग्रेसला देण्यात आली.
नागपूर - विदर्भातील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर काही जागा ठाकरे गटाला देण्यात आल्या. त्यात रामटेकच्या जागी काँग्रेसचे राजेंद्र मुळीक इच्छुक होते. मात्र ही जागा ठाकरे सेनेला सुटल्याने तिथे विशाल बरबटे यांना उमेदवारी मिळाली. त्यातच कामठी मतदारसंघात ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले हे इच्छुक होते. तिथे ही जागा काँग्रेसला सोडल्यानं नाराज गोडबोले यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
देवेंद्र गोडबोले यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यात ते म्हणाले की, मागील १७ वर्षापासून शिवसेना पक्षाचा शिवसैनिक म्हणून कार्यरत असून सध्या मी शिवसेना नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख या पदावर कार्यरत आहे. दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मी पक्षाच्या शिवसेना नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत असून आपण सदर राजीनामा स्वीकार करून मला कार्यमुक्त करावे. आपण दिलेल्या संधी आणि मानमराबतासाठी मी आपला सदैव ऋणी राहील असं त्यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत देवेंद्र गोडबोले?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंकडील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत गेले. नागपूरातही ठाकरे सेनेला खिंडार पडले होते. त्यावेळी रिक्त झालेल्या जिल्हाप्रमुख पदावर देवेंद्र गोडबोले यांची उद्धव ठाकरेंनी नियुक्ती केली. त्यांच्यावर पूर्व विदर्भातील कामठी, उमरेड आणि रामटेक मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. कामठी तालुक्यात देवेंद्र गोडबोले मागील २ वर्षापासून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी आहेत. मूळचे काँग्रेसचे असलेले गोडबोले हे मौदा पंचायत समितीमध्ये उपसभापती होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत जिल्हा परिषदेत एन्ट्री मारली. एक आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातात.
विदर्भातील जागावाटपात रामटेक ठाकरे गटाला सुटल्यानंतरही तिथे काँग्रेस नेते दबावतंत्राचा वापर करत होते. तेव्हा देवेंद्र गोडबोले यांनी कामठी मतदारसंघात निवडणूक लढणार असं जाहीर केले. परंतु या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने (काँग्रेस) माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देवेंद्र गोडबोले हे पक्षावर नाराज झाले. याच नाराजीतून त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.