मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं. ४८ पैकी ३१ मतदारसंघात मविआ उमेदवार जिंकले. त्यात सर्वाधिक १३ जागा काँग्रेसनं जिंकून आणल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. त्यातूनच मविआच्या जागावाटपात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसला जास्तीत जागा मिळवण्यासाठी आग्रही होते. काँग्रेसचा राज्यात प्रभाव वाढला आहे. पटोलेंच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेसला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. त्यातून विदर्भासह काही जागांवर ठामपणे पटोलेंनी दावा सांगितला होता.
काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट यांच्यातील जागावाटपाच्या वाटाघाटीत प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात काँग्रेसनं घटकपक्षांना काही जागा सोडाव्यात अशी मागणी मित्रपक्षाकडून होत होती. विशेषत ठाकरे गट विदर्भातील जागांसाठी आग्रही होता. मात्र नाना पटोलेंनी विदर्भातील जागांवर ठाम भूमिका घेतली. विदर्भात काँग्रेसला अधिक पोषक वातावरण आहे. त्याठिकाणी भाजपाला हरवायचं असेल तर काँग्रेसनं अधिक जागा लढाव्यात यासाठी नाना पटोलेंनी प्रयत्न केले. त्यात ठाकरे गटाच्या दबावतंत्रालाही बळी न पडता नाना पटोलेंनी विदर्भातील जागांवर आग्रह धरला. विदर्भातील काँग्रेस नेत्यांनीही नाना पटोलेंच्या कार्यशैलीचं कौतुक केले. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल असा विश्वास नाना पटोलेंना आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं विदर्भात भाजपाला अनेक धक्के दिले. विदर्भ हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला राहिला आहे. त्यात नाना पटोले हे विदर्भातील असल्याने त्याठिकाणी काँग्रेसला अधिक जागा सुटाव्यात यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विदर्भातील राजकीय परिस्थितीचं अधिक भान असल्याने पटोलेंनी विदर्भात काँग्रेसला अधिक बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एकत्रित करण्याचं काम केले. मात्र जागावाटपात विदर्भातील जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात टोकाचा वाद झाला. शिवसेनेचा विदर्भात फारसा प्रभाव नाही. त्यामुळे त्याठिकाणी जागा सोडण्यास पटोलेंचा विरोध होता.
नाना पटोलेंना हायकमांडकडून पाठबळ
जागावाटपाच्या चर्चेत नाना पटोले अधिक आक्रमक आणि आग्रही राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं राहुल गांधींशी असलेले चांगले संबंध. लोकसभेतील यशामुळे नाना पटोले हे राहुल गांधी यांचे विश्वासू बनलेत. राज्यात काँग्रेसमध्ये पुन्हा नवचैतन्य उभं करण्यासाठी पटोलेंना हायकमांडकडून पाठबळ मिळत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे मविआच्या जागावाटपात काँग्रेसच्या हितासाठी नाना पटोले अधिक आक्रमक असल्याचं दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्या दबावापुढे न झुकता पटोले काँग्रेसला अधिक जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील राहिले. त्यामुळे भविष्यात जर काँग्रेसला राज्यात चांगलं यश मिळालं तर नाना पटोलेंना महत्त्वाचं स्थान मिळू शकते अशी शक्यता वाढली आहे.
जागावाटपावर राहुल गांधी नाराज?
योग्य पद्धतीने तुम्ही वाटाघाटी केल्या नाही म्हणून राहुल गांधी जागावाटपावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर नाना पटोले म्हणाले की, "काँग्रेस पक्ष माध्यमांच्या माध्यमातून टार्गेट केला जातो, असंच आम्हाला दिसत आहे. आमचे नेते राहुल गांधींनी... बरोबर आहे की, महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजे. विशेषकरून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई या भागात काँग्रेसला मेरिटच्या आधारे जास्त जागा मिळायला पाहिजे. पण, आघाडी आमच्या तीन पक्षांची आणि आमचे अजून मित्रपक्ष, या सगळ्यात हा घोळ झाला. आम्ही त्यांना त्या पद्धतीने समजून सांगितलं. त्यांनी समाधान व्यक्त केलं असं नाना पटोलेंनी सांगितले.