धुळे - काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी संघर्ष करण्याचा धोकादायक खेळ खेळला जातोय. हा खेळ यासाठी आहे कारण काँग्रेस कधीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना पुढे येताना पाहू शकत नाही. हाच काँग्रेसचा इतिहास आहे. स्वातंत्र्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना, वंचितांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नेहरू त्याला विरोध करत होते. अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण लागू केले, त्यांना संघर्ष करावा लागला असं सांगत काँग्रेस जातीजातीत भेद निर्माण करण्याचा डाव रचत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
धुळे येथील जाहीर सभेत मोदींनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर घणाघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, SC, ST आणि OBC कमकुवत राहावा असेच काँग्रेसला नेहमी वाटते. राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षणाचा उघडपणे विरोध केला होता. जर एससी, एसटी आणि ओबीसी हा समाज एकजूट झाला तर काँग्रेसच्या राजकीय दुकानदारीचं शटर बंद होईल असं त्यांना वाटत होते. राजीव गांधीनंतर आता कुटुंबाची चौथी पिढी या धोकादायक प्रवृत्तीने त्यांचे युवराज काम करत आहेत. काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे, कुठल्याही प्रकारे एससी, एसटी, ओबीसी समाजाची एकजूट तोडावी असंही त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय SC समाज विविध जातीत विखुरला जावा, जेणेकरून त्यांची सामुहिक शक्ती कमी पडेल. ओबीसी समाजही वेगवेगळ्या जातीत विभागला जावा जेणेकरून ओबीसींची एकजुटता कायम राहिली तर त्यांची ताकद वाढेल. ही ताकद वाढू नये म्हणून ओबीसी समाजाला जाती जातीत विखुरण्याचा प्रयत्न केला जात आहे. एसटी समाजही वेगवेगळ्या जातीत विभागला जावा. आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाज एकत्रितपणे एकजूट पुढे आले आहे. ते मजबुतीने त्यांचा आवाज उचलू नये त्यासाठी त्यांना जातीत विखुरले जावे हा काँग्रेसचा डाव असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस छोट्या छोट्या जातींना एकमेकांशी लढवत आहे. आदिवासींची ओळख, दलितांची एकता हे तोडण्यामागे काँग्रेस लागली आहे. आदिवासी समाजाची एकजूटता काँग्रेसला पाहवत नाही. देशातील आदिवासी समुह एकमेकांशी संघर्ष करावा. त्यातून त्यांचा सामुहिक ताकद कमी व्हावी. काँग्रेसने धर्माच्या नावावर असे षडयंत्र रचले तेव्हा देशाचे विभाजन झाले. आता काँग्रेस एससी, एसटी, ओबीसीतल्या जातींना एकमेकांविरोधात लढवत आहे. भारताविरोधात इतकं मोठं षडयंत्र दुसरं असू शकत नाही. आदिवासी एकजूट राहिला तर त्याची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातीत विभागला गेला तर कमकुवत व्हाल, त्यामुळे एक आहात तर सेफ आहात असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.