बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य या महायुतीमधील नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद संपण्याचं नाव घेत नाही आहे. लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी भूमिका घेतली होती. तसेच बच्चू कडूंचा विरोध हा नवनीत राणा यांच्या पराभवामधील एक कारण ठरला होता. त्यावरून आता नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे. काही भाऊ असे असतात, जे निवडणुकीत पाडण्यासाठी सुपारी घेतात, अशी टीका नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केली आहे.
राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद विधानसभा निवडणुकीदरम्यानही गाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना लक्ष्य करताना नवनीत राणा म्हणाल्या की, इथे काही भाऊ असे आहेत, जे दुसऱ्याला पाडण्याची सुपारी घेतात. ते कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे ना? कोण आहेत ते? टोळी बहाद्दूर कोण? ब्लॅकमेलर कोण? ढोंगी नाटक करणारा कोणय़ असा सवाल राणा यांनी उपस्थितांना विचारला. त्यावेळी उपस्थितांना बच्चू कडू यांचं नाव घेतलं.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यास बच्चू कडू यांनी विरोध केला होता. एवढंच नाही तर बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात दिनेश बूब यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत नवनीत राणा यांचा काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी पराभव केला होता.