केसाने गळा कापण्याचं काम आबांनी केलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:06 PM2024-10-29T16:06:44+5:302024-10-29T16:08:40+5:30
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. आज राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला, तिथे अजितदादांनी विविध गौप्यस्फोट केले.
सांगली - मी इतकी मनापासून आबांना साथ दिली, जे मागेल ते दिले. मला माझ्यावरील आरोपांबाबत उघड चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आबांनी सही करून दिले. केसाने गळा कापायचा हा धंदा अशा शब्दात अजित पवार यांनी दिवंगत आर.आर पाटील यांच्याविषयी गौप्यस्फोट केला. तासगाव येथील जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, आबांना राजीनामा द्यायला लावला तेव्हा तो न सांगता अंजनीला निघून आला. मला सांगायचे ना...मला सांगितले नाही. १५ दिवस, महिनाभर लोक भेटायला आले त्यानंतर कुणी भेटायला आले नाही. तेव्हा मला म्हटला, दादा कुणी भेटायला येत नाही, लोक किती स्वार्थी आहेत. पहिले रिघ लागायची. तेव्हा मी म्हटलं, काळजी करू नको, मी बघतो. तेव्हा मी विनायक मेटे यांना हेलिकॉप्टरने आबांना घ्यायला पाठवले आणि त्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले. मी प्रत्येकवेळी आबांना आधार दिला, पाठीशी उभा राहिलो. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटलं. मी इतकी मनापासून आबांना साथ दिली, जे मागेल ते दिले, २००४ साली आमच्यात बेट लागली, काँग्रेसपेक्षा आपल्या जागा जास्त येतील. तेव्हा जर असं झालं तर माझ्याकडून तुला नवी कोरी स्कोडा कार भेट देतो असं सांगितले. जास्त जागा आल्यावर लगेच नवीन कार त्याच्या घरी पाठवली. पैज लावली होती, त्याने जिंकली. प्रत्येक काळात मी त्याला आधार दिला. तंबाखू खाऊ नको हे मी त्याला सांगितले, मी नसलो की गुपचूप घ्यायचा. दुदैवाने हे झाले असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचले. ७० हजार कोटींच्या सिंचनाचा आरोप केला. अजितराव घोरपडे तेव्हा मंत्री होते. माझ्यावर जो आरोप झाला तेव्हा महाराष्ट्राची निर्मिती होऊन त्यादिवसापर्यंत पगाराचा खर्च ४२ हजार कोटींचा होता. मला ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांचा विश्वास बसेल असं झाले, मग त्यातून एक फाईल तयार झाली ती गृहखात्याकडे आली. तेव्हा आबांनी अजित पवारांनी उघड चौकशी करावी अशी सही केली. केसाने गळा कापायचे धंदे, मला हेदेखील माहिती नव्हते. आपण पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा काढून घेतला, सरकार गेले, तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली, त्यावेळचे राज्यपाल म्हणाले, मी या फाईलवर सही करणार नाही. नवीन सरकार आले त्याचा मुख्यमंत्री करेल. निवडून आले देवेंद्र फडणवीस सरकार, देवेंद्र फडणवीसांनी सही केली. मला घरी बोलावले, मुख्यमंत्र्याकरता जी सही होती ती त्यांनी केली, तेव्हा गृहमंत्री म्हणून आबांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यांची सही दाखवली. मला इतकं वाईट वाटलं. जीवाभावाचा सहकारी होता, आपलं काहीतरी चुकलं असेल त्यामुळे कामाला लावलं असेल असा आरोप अजित पवारांनी आबांवर केला.
दरम्यान, आबा प्रामाणिकपणे, स्वच्छपणे काम करत होते, महाराष्ट्रात गृहमंत्रिपदी असताना पारदर्शक भरती करून घेतली. अत्यंत सक्षमपणे त्यांनी गृहमंत्रिपद सांभाळले. आज आबांना जाऊन साडे नऊ वर्ष झाली, आज त्यांच्यावर आरोप झाले ते पाहून अतिशय दुख: झाले. अजित पवार ज्येष्ठ आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केले आहे. त्यांनी जे आरोप केले ते कुटुंब म्हणून वाईट वाटले. आबा हयात असते तर आबांनी त्याला उत्तर दिले असते. आबांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला, यावेळी त्यांना मोठमोठ्या ऑफर असताना डान्सबार बंदीवर ते ठाम राहिले. महाराष्ट्रातील विचारांचे संरक्षण झाले पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. या वक्तव्याच्या विरोधात जनता उत्तर देईल असं सांगत आर.आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.