लोकसभा निवडणुकीत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी केलेली टीका लक्षात ठेवत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढविण्याची उघड भुमिका घेतली होती. यासाठी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पवार विरोधक जोडण्यास सुरुवात केली होती. य़ामुळे अजिच पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी घालत शिवतारेंचे बंड थांबविले होते. तेव्हा अजित पवारांनी शिवतारेंना विधानसभेवर पाठविण्याचा शब्द दिला होता. परंतू, आता शिवतारेंविरोधातच उमेदवार दिल्याने शिवतारे संतापले आहेत.
अजित पवार यांनी संभाजी झेंडे यांना पुरंदर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यामुळे शिवसेनेचे शिवतारे आणि राष्ट्रवादीचे झेंडे अशी महायुतीतच लढत होणार आहे. झेंडे यांनी लोकसभेला सुनेत्रा पवारांना पाडण्याचे काम केल्याला आरोप शिवतारे यांनी केला आहे. अशा व्यक्तीला अजित पवारांनी उमेदवारी दिल्याने शिवतारेंनी संताप व्यक्त केला आहे.
पुरंदर हवेली मतदारसंघातून विजय शिवतारेंना शिंदे शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. तर अजित पवारांनी झेंडेंना उमेदवार केले आहे. दोन्ही उमेदवार त्या त्या पक्षाच्या एबी फॉर्मवर लढणार आहेत. आता पुढील ३ तारखेपर्यंत कोण उमेदवारी माघारी घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच झेंडेंनीही आपणच लढणार असल्याचा दावा केला आहे. मला एबी फॉर्म मिळाला आहे. त्यामुळे शिवतारे त्यांच्या पद्धतीने आणि मी माझ्या पद्धतीने लढणार असल्याचे म्हटले आहे. यावर अजित पवारांची ही वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका शिवतारे यांनी केली आहे.
संभाजी झेंडेंनी सुनेत्रा पवारांना पाडण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिन्ही नेत्यांसमोर शब्द दिला होता की पुरंदरचा किल्लेदार विधानसभामध्ये पाठवावे. तरी देखील अजित पवारांनी उमेदवार दिला. बरे, राष्ट्रवादीचा निष्ठावान नेत्याला संधी दिली असती तरी चालले असते. परंतू पत्नीला पाडणाऱ्या नेत्याला उमेदवारी देताना अजित पवारांनी आपला स्वाभिमान कुठे ठेवला, असा सवाल शिवतारे यांनी उपस्थित केला.