विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची तारीख जवळ येत असली तरी महायुतीमधील जागावाटपाची आकडेवारी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही. त्यामुळे महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तरीही वाद नसलेल्या जागांवर उमेदवार निश्चित करण्यास महायुतीमधील सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. त्यात अजित पवार गटानेही आपल्या काही नेत्यांना ए-बी फॉर्म दिले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट किती जागा लढवणार याबाबत विचारणा केली असता अजित पवार यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किती जागांवर लढणार, असं विचारलं असता अजित पवार यांनी मी बेरीज करतो आणि उद्या आकडा सांगतो, असं उत्तर दिलं.
दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाला अंतिम रूप येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्येही काही प्रमाणात इनकमिंग होताना दिसत आहे. आज भाजपाचे नेते राजकुमार बडोले यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तर नुकतेच शरद पवार गटात गेलेले राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनीही आज अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे त्या अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.