मुंबई - बटेंगे तो कटेंगे हे कुठेतरी धार्मिक भावनेशी खेळण्याचं काम आहे. यामुळे मत मिळत नाही हे लोकांना कळलं पाहिजे. याच प्रकारच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसला आहे. भाजपाला याचा फायदा महाराष्ट्रात होणार नाही. अशाप्रकारे विधाने करून कुठल्याही निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही त्याला स्वीकारणार नाही अशी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांनी घेतली आहे.
नवाब मलिकांनी सांगितले की, कुठल्याही भावनेशी खेळण्यासाठी शाब्दिक खेळ केले जातात. या देशात जे मुलभूत अधिकार आहेत ते कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे. प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यावर कुणी बंदी घालू शकत नाही. बरेच लोक वेगवेगळे धर्मांतर केले जाते. कुठल्याही नागरिकाला ज्या धर्मात जायचं आहे तो जाऊ शकतो कुणी थांबवू शकत नाही. राजकीय फायद्यासाठी हे विषय घेतले जातात असं सांगत नवाब मलिकांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या घोषणांवर प्रहार केला आहे.
तसेच माझा विरोध भाजपा करते हे उघड सत्य आहे. लोकांना ते दिसते. माझ्याविरोधात महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे सत्य आहे. आमची विचारसरणी सोडून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रश्न नाही. जो काही वादविवादाचे विषय असतील त्याला आमचा पाठिंबा नाही.जे माझ्याकडे बोट दाखवतायेत कालपर्यंत ते सगळे भाजपासोबत होते. काँग्रेसचे नेते भाजपात गेले ते पुन्हा इथे आले आहेत. शरद पवार भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले, १० वर्ष पुलोदचा फॉर्म्युला महाराष्ट्रात चाललाय. मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते. ममता बॅनर्जी भाजपासोबत होत्या. फारूख अब्दुला, मुफ्ती सईद हे जनता दलाचे सरकार असताना पाठिंबा देत होते. राजकीय परिस्थितीनुसार प्रत्येकाने भूमिकेत तडजोड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काही तडजोड करून राजकारण करत असेल तर आता जे बोट दाखवतायेत त्यांनी मागील इतिहास पाहिला पाहिजे असं सांगत नवाब मलिकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे.
दरम्यान, ज्यांना माझ्यापासून राजकीय धोका असेल ते लोक माझा जामीन रद्द व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. आम्ही आमची बाजू कोर्टात मांडू. राजकीय पार्श्वभूमी असल्याने ज्यारितीने मी माझे विचार मांडतोय. ताकदीने दोन्ही ठिकाणी निवडणूक लढतोय त्याचे नुकसान कोणाला होत असेल तर ते अशाप्रकारे प्रयत्न करत आहेत. कोर्टाच्या आदेशाने मी गप्प होतो. माध्यमांशी संवाद साधला नाही. परंतु आता मला कोर्टाने परवानगी दिली आहे. मी माध्यमांशी बोलतोय. राजकीय माणूस देशात, राज्यात चांगले वाईट घडत असेल तर मी बोलणार. माझ्यामुळे कुणी अडचणीत येत असेल तर माझा जामीन रद्द होण्यासाठी ते काम करतील असा आरोपही नवाब मलिकांनी केला.