"गेल्या अडीच वर्षापासून..."; महायुतीवर टीका करत अजित पवारांच्या आमदाराने दिले पक्ष सोडण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 09:00 AM2024-10-16T09:00:43+5:302024-10-16T09:05:24+5:30

मराठवाड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election 2024 NCP MLA Satish Chavan criticized the Mahayuti government | "गेल्या अडीच वर्षापासून..."; महायुतीवर टीका करत अजित पवारांच्या आमदाराने दिले पक्ष सोडण्याचे संकेत

"गेल्या अडीच वर्षापासून..."; महायुतीवर टीका करत अजित पवारांच्या आमदाराने दिले पक्ष सोडण्याचे संकेत

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांना धक्के बसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गजांनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या प्रक्षात प्रवेश केला आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही पक्षातून गळती सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.  सतीश चव्हाण यांनी एक पत्र लिहून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता सतीश चव्हाण  यांनी सुद्धा पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. तसेच सतीश चव्हाण हे सुद्धा शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.

राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरीस सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसात नाराज असलेल्या अनेकांनी अजित पवार यांना रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अशातच मराठवाड्यातही अजित पवार यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रातून नाराजी व्यक्त करत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता ते देखील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटलं जात आहे. 

पदवीधर आमदार असलेले सतीश चव्हाण यांना गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र सतीश चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. आमदार सतिश चव्हाण यांनी पत्र लिहून महायुती सरकारच्या कारभारावर केली सडकून टीका आहे. गेल्या अडीच वर्षात मराठा मुस्लिम धनगर आणि आदिवासी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्या बाबत सरकारला अपयश आल्याची टीका सतीश चव्हाण यांनी केली आहे.

"मागील अडीच वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे. मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती, मात्र महायुतीचे सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवू शकले नाही," असे सतीश चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

"मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्यावर्षी नवी मुंबईतील वाशी येथे मोर्चा धडकल्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे यांची भेट घेऊन ५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना आरक्षण देणार, कुणबी नोंदी सापडलेल्यांना सगेसोयरे प्रमाणपत्र देणार, अशा मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र त्यानंतर मराठा आंदोलनाचा प्रश्न हाताळण्यात सरकारला यश आले नाही. आजही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. आज मराठवाड्यासह महाराष्ट्रात अनेक मराठा तरुण आत्महत्या करत आहेत, या गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही," अशीही टीका सतीश चव्हाण यांनी केली आहे.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 NCP MLA Satish Chavan criticized the Mahayuti government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.