Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीत भाजपा पाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. यातच आरक्षणावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अनेक नेते मंडळी, मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी गर्दी करताना दिसत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेतली.
बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीबाबत माहिती दिली. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो. ही काही राजकीय भेट नाही. हे माझे श्रद्धास्थान आहे. म्हणून भेटीसाठी आलो. या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची होती, असे बजरंग सोनावणे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाची भूमिका काय, हा भाग वेगळा तसेच मनोज जरांगे यांची राजकीय भूमिका काय, हा भाग वेगळा आहे. त्यामुळे राजकीय चर्चा करायचा विषय नव्हता. इथूनच पुढे जात होतो, म्हणून भेटायला आलो, असे बजरंग सोनावणे म्हणाले.
बीडमधील सर्व जागा निवडून आणू
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा मी खासदार आहे. बीड जिल्ह्यातील सहाही जागांवर दावा करण्याचा आमचा अधिकार आहे. परंतु, महाविकास आघाडीचा जो निर्णय असेल, त्यात एक दोन जागा इकडे, तिकडे जाऊ शकतात. उर्वरित जागा आमच्या पक्षाला मिळू शकतात. जास्तीच्या जागा आमच्या पक्षाला नक्की मिळतील. एखादी ठाकरे गटाला जाईल, एखादी काँग्रेसला जाऊ शकते. आज, उद्याकडे अंतिम निर्णय होईल. हा निर्णय झाला की, तुम्हाला कळेल. पण, जिल्ह्यातील सहाही जागा, मग आमच्या पक्षाच्या चार असतील, पाच असतील किंवा सहा असतील, त्या सगळ्या जागा निवडून आणण्यासाठी काम करू, असे बजरंग सोनावणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मंगळवारी रात्री शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. यात मंत्री उदय सामंत, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, भाजपा नेते सुरेश धस यांच्यासह अनेक नेते मंडळी, पदाधिकारी यांचा समावेश आहे.