विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. काल निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथील सभेपूर्वी ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी केली. आज दुसऱ्या दिवशीही औसा येथे ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी केली, यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय असा आरोप करत ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. "सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याच बॅगा कशा चेक होतात. उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जातंय. रोज उद्धवजींची मग अमोल कोल्हे यांची... असं कसं होऊ शकतं? तुम्ही योगायोग पाहा भारतीय जनता पक्षात आमच्या गडकरी साहेबांची बॅग चेक झाली, बाकी कोणत्या नेत्याची झाली नाही."
"आज कशी बॅगची तपासणी झाली... कारण टीव्हीवर दोन दिवस उद्धवजी यांची तपासणी केल्याचं दाखवलं. इतके दिवस का नाही झाली? उद्धव ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही? आणि जर आधी झाली असेल तर आधी का सांगितलं नाही?" असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.
जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची देखील बॅग तपासण्याचे आव्हान दिलं. माझी बॅग तुझ्याकडेच देतो, ती घेऊन येत जा. फक्त त्यातील कपडे चोरू नकोस, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.