नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 05:51 AM2024-10-27T05:51:56+5:302024-10-27T05:53:42+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसने अनेक नव्या चेहऱ्यांना व काही ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना संधी देण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी दोन याद्या जाहीर केल्या. ४८ उमेदवारांची पहिली यादी आधीच जाहीर झाली होती. शनिवारी सकाळी दुसरी यादी २३ नावांची तर सायंकाळी तिसरी १६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत जाहीर झालेल्या काँग्रेस उमेदवारांची संख्या ८७ झाली आहे.
काँग्रेसने अनेक नव्या चेहऱ्यांना व काही ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना संधी देण्यात आली आहे. जालनाचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नव्हते, त्यांना दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आले आहे. श्रीरामपूर मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी हेमंत ओगले यांना संधी देण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत दिग्रस येथून माणिकराव ठाकरे, अंधेरी पश्चिम जागेसाठी सचिन सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
या नेत्यांच्या नातेवाईकांना संधी
बँक घोटाळ्यात ५ वर्षाची शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांनी आमदारकी गमावली. विधानसभा लढवण्यास शिक्षेला स्थगिती आवश्यक होती. मात्र, केदार यांनी सत्र न्यायालयात मुदतीत अर्ज न केल्यामुळे ते निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याजागी पत्नी अनुजा उमेदवार झाल्या.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीतून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र, वर्धातून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखर, तर अकोटमधून माजी आमदार सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश यांना संधी मिळाली आहे.
बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर
कामठी मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांना रिंगणात उतरवले आहे.
शरद पवार गटाचे २२ उमेदवार जाहीर
शरद पवार गटाकडून शनिवारी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. अजित पवार गटातून आलेल्या सतीश चव्हाण यांना (गंगापूर) आणि दीपक चव्हाण यांना (फलटण) उमेदवारी देण्यात आली आहे. फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवार गटाकडून प्रामुख्याने उमेदवार देण्यात आले आहेत.
उद्धवसेनेच्या दुसऱ्या यादीत १७ उमेदवार
उद्धवसेनेने आणखी १७ उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरुद्ध संदेश पारकर यांना कणकवलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदेसेनेचे उमेदवार मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध पवन जयस्वाल यांना संधी देण्यात
आली आहे.