ठाणे- विरोधक बिथरलेले आहेत. सूडाने पेटलेले आहेत ते राज्याचे भले काय करणार...विरोधक दुश्मनीची भाषा वापरतायेत असा हल्लाबोल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त शिंदेंनी ठाण्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे फक्त २-३ शब्द आहेत, बाकी काही नाही. माझे हे चोरले, ते चोरले, लहान मुलासारखं माझी बाहुली चोरली, लोकांसाठी काय काम करणार ते सांगा, या राज्यासाठी तुमचं व्हिजन सांगा. मला काय मिळाले यापेक्षा राज्याला काय दिले, देशाला काय दिले, राज्यातील जनतेला काय मिळेल हे बघणारे आम्ही लोक आहोत. दोन सव्वा दोन वर्षात आम्ही लोकांसाठी काम केले हे जनतेला माहिती आहे. आमचा अजेंडा विकासाचा आहे. विकासाच्या दृष्टीने राज्य पुढे नेणार आहेत. कल्याणकारी योजना मजबूत करणे, लाडकी बहिण योजना विरोधक सत्तेत आल्यावर बंद करणार, योजनांची चौकशी करू, आम्हाला जेलमध्ये टाकू असं बोलतायेत. आम्ही तयार आहोत. आमच्या सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना बंद करून पाहणारे सावत्र भाऊ यांना आमच्या लाडक्या बहिणी सरकारमध्ये येऊ देणार नाही. त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. घरी बसून सरकार चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येणार नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.
तर पुढील मुख्यमंत्री भाजपाचा होणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमची महायुती टीमवर्कने चाललीय, महायुतीने केलेले अडीच वर्षाचं काम आणि मविआने केलेले काम यांच्या तुलना होऊन जाऊ द्या, आम्ही समोरासमोर चर्चा करायला तयार आहे. आम्ही रिपोर्ट कार्ड समोर आले. रिपोर्ट कार्ड समोर आणायला धाडस लागते. विरोधकांनी आपलं काम दाखवावे. जनतेच्या दरबारात फैसला होऊन जाऊ द्या. इलाका कुणाचा जरी असला तरी धमाका आम्हीच करणार आहोत. महायुतीने केलेले काम त्याची पोचपावती लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी सगळेच आम्हाला देणार आहे. आम्ही केलेल्या कामावर जनता खुश आहे. जे आमच्या विरोधात बोलणारे आज बाजूने बोलू लागले. विरोधात सर्व्हे देणारे आज बाजूने देऊ लागले असं सांगत मुख्यमंत्रिपदावर भाष्य करणे टाळले.
दरम्यान, महायुतीत काही संघर्ष नाही, विसंवाद नाही. मी देवेंद्र फडणवीस, अजितदादा कालही बैठकीत बसलो होतो. समन्वयाने आम्ही ही निवडणूक लढवतोय. एकजुटीने आणि ताकदीने ही निवडणूक लढवतोय. निकालानंतर बहुमत महायुतीला मिळणार.विरोधक बिथरलेले आहेत. सूडाने पेटलेले आहेत ते राज्याचे भले काय करणार...विरोधक दुश्मनीची भाषा वापरतायेत. तुमचे अडीच वर्षाचे सरकार असताना तुम्ही हे करून झालंय, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकले, केंद्रीय मंत्र्यांना जेलमध्ये टाकले, पत्रकारांना जेलमध्ये टाकले, साधू हत्याकांड झाले, विरोधकांकडून दुसरी अपेक्षा नाही. विरोधक अहंकारी आहेत, २० तारखेला महाराष्ट्रातील जनता अहंकारी रावणाचं दहन करणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला.