- मंदार पारकर मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या पुढच्या पिढ्यादेखील विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. यातील काहीजण आधीही आमदार राहिले आहेत, तर काही पहिल्यांदाच नशीब आजमावत आहेत. यात विशेष म्हणजे अमित देशमुख - धीरज देशमुख आणि नीलेश आणि नितेश राणे या दोन सख्ख्या भावांच्या जोड्या निवडणूक रिंगणात आहेत. महाराष्ट्राला मोठ्या राजकीय घराण्यांची परंपरा तर आहेच, परंतु त्यांच्यातील सदस्यांसोबत आता माजी मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या पुढच्या पिढ्याही राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. यंदाच्या निवडणुकीत हेच चित्र कायम आहे.
सख्खे भाऊ यंदा रिंगणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहरमधून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांचेच धाकटे बंधू धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून दुसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र व माजी खासदार नीलेश राणे आता कुडाळचे शिंदेसेनेचे उमेदवार आहेत. त्यांचे धाकटे बंधू नितेश हे कणकवलीमधून पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
आधी वडील, मग मुलगाही सीएम महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा मान शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पिता-पुत्रांना मिळाला आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यंदा भोकर मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवत आहे.
मुलगी, जावईदेखील वारसदार माजी मुख्यमंत्री दिवंगत बाबासाहेब भोसले यांच्या कन्या सरोज भोसले या मुंबईत विधानसभा निवडणूक लढल्या. पण, पराभूत झाल्या होत्या. माजी मुख्यमंत्री दिवंगत अब्दुल रहमान अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले हे राज्यमंत्री राहिले. आता ते अजित पवार गटात आहेत.
मुलगा, पुतण्या अन् नातूही nशिवाजीराव पाटील - निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील - निलंगेकर हे निलंगा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेदेखील दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. वरळी मतदारसंघातून ते लढत आहेत. nमाजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून उभे आहेत, तर नातू रोहित पवार कर्जत- जामखेडमध्ये लढत आहेत. दुसरे नातू युगेंद्र हे अजित पवारांविरोधात लढत आहेत.
नाईक घराण्यात दोनदा मुख्यमंत्रिपद वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक या काका-पुतण्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले. वसंतरावांचे नातू इंद्रनील नाईक हे परंपरागत मतदारसंघ पुसदचे विद्यमान आमदार असून, ते अजित पवार गटाकडून लढत आहेत. त्यांचे सख्खे भाऊ ययाती त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून लढू शकतात.वसंतरावांचे पुत्र अविनाश नाईक हे विधान परिषदेचे सदस्य व राज्यमंत्री राहिले. पण पुढे ते उद्योग व्यवसायात रमले. नातू नीलय हे जिल्हा परिषद अध्यक्ष, विधान परिषद सदस्य होते आणि भाजपमध्ये सक्रिय आहेत. सुधाकर नाईक यांचे बंधू मनोहर नाईक हे दीर्घकाळ आमदार व मंत्री होते.
काहींचे वारस झाले खासदारमाजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून खासदार झाल्या. त्याआधी त्या आमदार राहिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील हे सांगलीचे दीर्घकाळ खासदार होते. वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील हेही सांगलीचे खासदार राहिले व केंद्रात राज्यमंत्री होते. वसंतदादांचे दुसरे नातू विशाल पाटील नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे पुत्र दिल्लीत उद्योजक आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष हे राजकारणात सक्रीय होण्याऐवजी व्यवसायात रमले.