विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता धार चढू लागली असून, नेतेमंडळी एकमेकांवर बोचऱ्या शब्दांत टीका करत आहेत. त्यात काल शरद पवार यांच्यावर टीका करताना शेतकरी नेते शरद पवार यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने वादाला तोंड फुटलं आहे. या विधानावरून विरोधी पक्षांसह महायुतीमधील अजित पवार गटामधील नेत्यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता या वादात प्राण्यांचीही एंट्री झाली आहे. शरद पवारांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा उल्लेख संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा कुत्रा असा केला होता. त्यानंतर आता भाजपा नेत्यांनीही संजय राऊत यांना प्राण्यांची उपमा देण्यास सुरुवात केली आहे.
संजय राऊत सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस यांचे दोन दोन कुत्रे आहेत. ते नेहमी अशा घाणेरड्या पद्धतीने भुंकत असतात. देवेंद्र फडणवीस यांचे बगलबच्चे कोण आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करते. आधी गोपिचंद पडळकर म्हणून कुणीतरी होतं, आता हे सदाभाऊ खोत आलेत. त्यांची लायकी काय आहे, त्यांनी राजकारणात काय केलं आहे, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला होता.
संजय राऊत यांच्या या विधानावर पलटवार करताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पाळीव कुत्रेच आहेत. त्यांना टॉमी म्हणतात. पण कुत्रा तरी बरा, तो निष्ठावान असतो. पण संजय राऊत हे साप आहेत. सापाला दूध पाजलं तरी कधीतरी तो आपल्याच मालकाला डसतो, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
तर सदाभाऊ खोत यांनीही संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांमध्ये कुत्र्याएवढा इमानदार पणा असता तर महाराष्ट्रानं त्यांचं कौतुक केलं असतं. मला संजय राऊतांवर काही बोलायचं नाही. कारण डुकराला कितीही साबण, शाम्पू लावला तरी डुक्कर हा गटारातच जातो, असे विधान सदाभाऊ खोत यांनी केलं.