राज्यात निवडणुकीकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी नेतेमंडळी एकमेकांवर आरोपो प्रत्यारोप करतानाही दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांचे कौतुक करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. गडकरी चांगले नेते आहेत. पण, देवाभाऊ कॉपी करून पास झाला, दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाला. एवढेच नाही, तर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असेही सुळे यांनी म्हटले आहे. त्या चांदवड येथे एका प्रचारसभेत बोलत होत्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "देवाभाऊ एका भाषणात म्हणाले की, 'हो, मी उपमुख्यमंत्री झालो, पण दोन पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो.' मला आश्चर्यच वाटलं. म्हटलं देवाभाऊ, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. कारण, माझ्या देवाभाऊंकडून फार अपेक्षा होत्या."
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "अरे, विरोधात असला म्हणून काय झालं? चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. मी गडकरी साहेबांबद्दल चांगलंच बोलते, कारण की गडकरी साहेब चांगलेच आहेत. चांगल्याला चांगलेच म्हणायला हवे. विरोधक असला म्हणून काय झालं? गडकरी साहेब चांगले, पण प्रॉब्लेम गडकरी साहेबांचा नाही, प्रॉब्लेम पक्षाचा आहे." एवढेच नाही तर, "गडकरी साहेब चांगले आहेत तर मला वाटलं देवाभाऊ पण चांगला असेल. नंतर ध्यानात आलं की देवाभाऊ कॉपी करून पास झाला, दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाला," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.