Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसांत चर्चा करून मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशीसुद्धा चर्चा सुरू असून, त्यावरही लवकरच निर्णय होईल.
महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महायुतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड गोंधळ आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या जागांवरही भाजपनेच उमेदवार दिले आहेत. या दोन्ही पक्षांना संपविण्याची भाजपची खेळी असून, त्याची सुरुवात झाली आहे, अशी टीका चेन्नीथला यांनी केली.
महायुतीचे सरकार भ्रष्ट आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून, सरकारने दोन वर्ष महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेले, जाता - जाता युती सरकारने भरमसाट निर्णय जाहीर केले, पण त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडकी बहीण योजना बंद पडली आहे. भ्रष्टाचारी सरकारला घालविण्याचा निर्धार जनतेने केला असून, मविआचे सरकार येईल, असेही चेन्नीथला म्हणाले.
राहुल गांधी ६ नोव्हेंबरला महाराष्ट्रातकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून, संध्याकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार व उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही चेन्नीथला यांनी दिला.