जालना - महाराष्ट्रात एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे उद्या दलित, मुस्लीम आणि मराठा समीकरणाबाबत बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीनंतर कोणते मतदारसंघ लढायचे, कोणते उमेदवार द्यायचे, काय समीकरण जुळवायचं ते चर्चेत ठरेल. आज कुणाला पाठिंबा नाही, कुणाला उमेदवार बनवल्याचंही सांगितले नाही असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, बरेच जण इथं भेटायला येऊन फोटो काढतात, मला पाठिंबा आहे असं सांगतायेत. अजून कुणाला पाठिंबा दिला नाही. उद्या आमची बैठक होईल. अजून निर्णय झाला नाही मग पाठिंबा कुणी दिला..? राजकारणात जितके खोटे बोलतात तितके चमकतात. मला सलाईन घेऊ द्या, ३१ तारखेच्या निर्णयानंतर बॉन्ड वैगेरे सर्व निर्णय घेऊ. हे पूर्ण राज्यासाठी आहे. लढायचं की नाही, समीकरण जुळतंय की नाही हे बैठकीत ठरवू द्या असं त्यांनी सांगितले.
तसेच आमचा निर्णय झाला नाही, त्यामुळे शब्द का देऊ...मी ज्याला शब्द देतो तो पाळतो, खोटे शब्द देत नाहीत. माझ्याकडून अनेकांना अपेक्षा आहेत. त्यामुळे जोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत बोलणार नाही. मी आजारी असून तुमच्याशी बोलायला आलो. ३१ तारखेला दलित, मराठा आणि मुस्लीम असं समीकरण जुळतंय का त्याबाबत चर्चेसाठी बैठक आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अधिकृत बैठकीत काय होतंय काय नाही, समीकरणाशिवाय मज्जा नाही. बैठकीत काय होईल हे मलाही माहिती नाही. सकारात्मक झाली, नकारात्मक झाली तरी चर्चा करावी लागेल. उद्या बैठक असेल, त्यात मुस्लीम बांधव, दलित बांधव येणार आहेत त्यामुळे इच्छुकांनी येऊन गर्दी करू नये. दिवसभरासाठी कुणीच अंतरवालीत येऊ नका. मुस्लीम बांधव बैठकीसाठी मोठ्या संख्येने येतील. त्यांचा सन्मान करणे खूप गरजेचे आहे. १-२ तारखेपर्यंत कुणी येऊ नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.