३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:22 AM2024-10-28T06:22:49+5:302024-10-28T06:24:01+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना सना मलिक यांच्याविरुद्ध उमेदवारी
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी शरद पवार गटाकडून ९ आणि अजित पवार गटाकडून ४ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. सद्यस्थितीनुसार राज्यातील २८८ पैकी ३२ जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होईल, असे चित्र आहे.
शरद पवार गटाच्या तिसऱ्या यादीत माजी मंत्री रमेश बंग (हिंगणा) यांच्यासह परळीतून राजेसाहेब देशमुख, अणुशक्तीनगरमधून स्वरा भास्करचे पती फहाद अहमद, चिंचवडमधून राहुल कलाटे, भोसरीतून अजित गव्हाणे, माजलगावमधून मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून आतापर्यंत ७६ उमेदवारांची घोषित करण्यात आले. याआधी पहिल्या यादीमध्ये ४५, तर दुसऱ्या यादीत २२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.
परळीत मुंडेंविरोधात मराठा चेहरा
राज्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या परळी मतदारसंघात मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाने मराठा कार्ड खेळत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे इथे लोकसभेनंतर पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळेल.
काेणाला कुठे मिळाली संधी?
- विद्यमान आमदार नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्याविरोधात अणुशक्तीनगरमधून शरद पवार गटाने समाजवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले, तसेच अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली आहे.
- माजलगाव मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात मोहन जगताप यांना संधी देण्यात आली आहे.
- चिंचवडमधून भाजपचे शंकर जगताप यांच्या विरोधात राहुल कलाटे, भोसरीमधून अजित पवार गटातून आलेल्या अजित गव्हाणे यांना भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.
- मोहोळमधून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या विरोधात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.