"माझ्याविरुद्ध कितीही चक्रव्यूह रचले तरीही..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 02:25 PM2024-09-06T14:25:24+5:302024-09-06T14:35:32+5:30
विरोधकांच्या टीकेवरून देवेंद्र फडणवीसांना हल्लाबोल, माझ्याविरोधात सगळे मिळून चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न करतायेत
मुंबई - माझ्याविरुद्ध कितीही चक्रव्यूह रचले तरीही मी अभिमन्यू होणार नाही. मी आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे मला माहिती आहे असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांच्या बातमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काही माध्यमात बातमी पाहिली, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी फक्त देवेंद्र फडणवीसांना हल्ला करा. ही आनंदाची गोष्ट आहे. यातून तुमचं राजकारणातील स्थान किती बळकट आहे याचा अंदाज येतो. सगळ्यांना मिळून एकाच व्यक्तीवर हल्ला करावा वाटतं, उद्धवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस तेच करते. हे माझ्याविरुद्ध चक्रव्यूह तयार करतायेत. तुम्ही चक्रव्यूह तयार करून मला अभिमन्यू करायचा प्रयत्न करत असला तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे त्यामुळे चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि त्यातून बाहेरही यायचं मला माहिती आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी अभिमन्य होणार नाही असं त्यांनी सांगितले.
काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना जागा दाखवली
सर्व्हे लीक होत नाहीत, टेबलावर बसून केलेला सर्व्हे तो त्यांनी लीक केला. उद्धव ठाकरे आणि आमचे पटत नसले तरी सांगतो, हा जो काही सर्व्हे तो उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्याकरता तयार केलेला आणि लीक केलेला सर्व्हे आहे. दुसरा या सर्व्हेत काही अर्थ नाही. त्यांना हे दाखवून द्यायचे होते की, कुठे तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याचं बोलताय, तुम्ही चौथ्या-पाचव्या नंबरवर चालले आहात. उद्धव ठाकरेंना काँग्रेसनं सर्व्हेतून जागा दाखवली. उद्धव ठाकरे ३ दिवस दिल्लीत जाऊन बसले. त्यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून घोषित व्हावा असा त्यांचा आग्रह होता. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे आम्ही दिल्लीला जात असतो, परंतु आमच्या दिल्ली दौऱ्यावर किती टीका, पण हे ३ दिवस दिल्लीत बसले, सोनिया गांधींना भेटले परंतु त्यांनी फोटो काढायला परवानगी दिली नाही. बैठकीचा फोटोही बाहेर आला नाही. एवढे होऊन ते पुन्हा इथं आले, काही घोषित झाले नाही अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली. टीव्ही ९ च्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते
शरद पवारांच्या डोक्यात ठाकरेंचा चेहरा नाही.
आता तर शरद पवारांनी स्पष्टपणे घोषित केले मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाही आणि त्यावर नाना पटोलेंनी लगेच री ओढली मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात जे आहे ते नाकारलं आहे. शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे हे शिजतंय. त्यांच्या डोक्यात जे काही ३-४ चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
राजकोट प्रकरणी जबाबदारी झटकली नाही
सिंधुदुर्ग राजकोट प्रकरणी माझे पूर्ण विधान ऐकले तर त्यात मी कुठेही जबाबदारी टाळली नाही. PWD नं भ्रष्टाचार केल्यामुळे हा पुतळा पडला असा मला प्रश्न विचारला तेव्हा हा PWD नं तयार केलेला पुतळा नाही नौदलाने तयार केलेला पुतळा आहे. नौदलाचा हेतूही चुकीचा असू शकत नाही. हे एकमेकांवर टाळण्याचा प्रयत्न नाही. पुतळा पडला ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. या मुळाशी जावं लागेल. त्यात कुठल्या चूका झाल्या असतील त्या सुधाराव्या लागतील आणि महाराजांचा तिथेच भव्य पुतळा उभारावा लागेल. मी कुठेही हात झटकण्याचं काम केलं नाही. पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी, अजितदादा आणि मीही माफी मागितली. महाराष्ट्रातील जनतेची, शिवप्रेमींची माफी मागितली त्यामुळे कुठेही जबाबदारी झटकली नाही. ही घटना लाजिरवाणी आहे असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं.