"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 05:36 PM2024-11-24T17:36:44+5:302024-11-24T17:37:44+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता राखत 288 सदस्यीय विधानसभेत 230 हून अधिक जागा जिंकल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला आहे. यानंतर आता, या निवडणुकीतील आश्चर्यकारक पराभवाची कारणे समजून घेण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत सर्व सहकारी पक्ष एकत्रितपणे आत्मचिंतन करू, असे काँग्रेसने म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता राखत 288 सदस्यीय विधानसभेत 230 हून अधिक जागा जिंकल्या आहेत.
आश्चर्यकारक पराभव -
या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडीला केवळ 46 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) महासचिव केसी वेणुगोपाल यासंदर्भात एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल “धक्कादायक” आणि “अविश्वसनीय” आहेत. “काय झाले हेच आम्हाला समजू शकत नाहीये. हा केवळ काँग्रेस पक्षाचाच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचा पराभव आहे. आम्हाला आधी नेमके काय झाले ते समजून घेऊ द्या.
हा संपूर्ण आघाडीचा पराभव -
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात काही गडबड झाल्याचे शक्यता वाटते की? असे विचारले असता ते म्हणाले, पराभवानंतर लगेचच मी असा कोणताही आरोप करत नाही. पण, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आम्हाला मोठा धक्का बसला आहे. हे केवळ काँग्रेस पक्षाचेच अपयश नाही, तर संपूर्ण आघाडीचे अपयश आहे. यामुळे आम्ही एकत्र बसून एकत्रितपणे आत्मपरीक्षण करू
महाराष्ट्रात महायुतीचा जय -
निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार, या निवडणुकीत भाजपला 132 जागा, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील, राष्ट्रवादी कँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 10, काँग्रेसने 16 तर शिवसेनेने (उद्धव बालासाहेब ठाकरे) 20 जागा जिंकल्या आहेत.