नागपूर - विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत २९० उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. आता अर्ज माघार घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. मात्र, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सण असल्याने तीन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत केवळ पाचच तासात अर्ज माघारी घेता येणार आहे. पहिल्यांदाच सर्वच मतदारसंघांत उमेदवारांची संख्या वाढली असल्याने आता कोण कोण माघार घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
नागपुरात छाननीनंतर एकूण २८० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. बाराही मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर अपक्ष आणि बंडखोर उमेदवार उभे आहेत. त्यामुळे मतदारसंघातील या उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. छाननीनंतर अर्ज माघार घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत असली तरी दिवाळीच्या तीन दिवस शासकीय सुट्या आल्याने सोमवारचा एकच दिवस तोही दुपारी ३ वाजेपर्यंतच आहे. उद्या उमेदवारांची मनधरणीसाठी राजकीय पक्ष व नेत्यांना रविवारचाच दिवस शिल्लक आहे.
सोमवारीच मिळणार उमेदवारांना चिन्ह...अर्ज माघार घेण्यासाठी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यानंतर एकूण सर्वच मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.जे उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील, त्यांना प्रमुख राजकीय पक्ष वगळून इतर अपक्षांसह सर्वच उमेदवारांना लागलीच चिन्ह वाटप केले जाणार आहे.