धुळे - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम आमच्या सरकारने दिले. या निर्णयानंतर लोक खूप भावूक आणि आनंदी असून जगभरातून मराठी लोक धन्यवाद देत आहेत. अभिजात भाषेचा दर्जा देण्याची अनेक वर्षांची मागणी होती. काँग्रेसने केंद्रात, राज्यात सरकारचे चालवले मात्र अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही, त्यांना त्याची गरज वाटली नाही. त्यांनी कायम याकडे दुर्लक्ष केले. आता मात्र त्यांना या निर्णयाचा त्रास होतो आहे. महाराष्ट्राच्या नावावर राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचा हा खरा चेहरा आहे असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमहाविकास आघाडीवर केला आहे.
धुळे येथे पहिल्या जाहीर सभेत मोदींनी घणाघात केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला विकासाची दिशा मिळाली आहे. महायुती सरकारने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात दिलेली वचने महाराष्ट्राची प्रगती करणारे आहेत. सर्व घटकाला न्याय देणारा हा जाहीरनामा आहे. जेव्हा महिला पुढे जातील, तेव्हाच खऱ्या अर्थाने या देशाची आणि महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. त्यामुळे आम्ही संसदेत आणि विधानसभेत महिलांना विशेष स्थान दिले आहे. केंद्राच्या धरतीवर महाराष्ट्र सरकारनेही महिलांच्या सशक्तीकरणासाठी पाऊले उचलली आहेत असं त्यांनी सांगितले.
तर काँग्रेस सरकारने आणलेली माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या तयारी करत आहेत. जर काँग्रेस सत्तेत आली तर ते आधी लाडकी बहीण योजना बंद करतील. महिलांबद्दल असभ्य भाषा वापरली जात आहे. इतकी वर्ष काँग्रेसची सत्ता असून त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही, यांची खंत वाटते. माझी लाडकी बहिण योजना सुरू ठेवायची असेल तर महिलांनी महाविकास आघाडी पासून सावध राहा. महिला महाविकास आघाडीच्या या कृत्याला माफ करणार नाहीत असा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला.
दरम्यान, काँग्रेस जातीजातीत भेद निर्माण करत आहे. स्वातंत्र्य काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना, वंचितांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नेहरू त्याला विरोध करत होते. अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण लागू केले. नेहरूनंतर इंदिरा गांधींनीही एससी, एसटींना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी प्रयत्न केले. हे घटक कमकुवत राहावे यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. एससी, एसटी, ओबीसी हा समाज मजबूत झाला तर काँग्रेसच्या राजकारणाचं दुकान बंद होईल ते त्यांना माहिती आहे. काँग्रेसचा एकमेव अजेंडा कुठल्याही प्रकारे एससी, एसटी समाजाची एकता तोडा. ओबीसी समाजाची एकता तोडा. एससी समाज वेगवेगळ्या जातीत विखुरला जावा. जेणेकरून या समाजाची सामुहिक शक्ती कमी होईल. ओबीसी समाजही वेगवेगळ्या जातीत विखुरला जावा असं काँग्रेसला वाटते. ओबीसी एकजूट राहिले तर त्यांची ताकद वाढेल, ते होऊ नये यासाठी ओबीसी समाजात जातीजातीत विभागला जावा यासाठी राजकारण करत आहे असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला.
शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार मदत देण्याची घोषणा
धुळ्याला विकास, कनेक्टिव्हिटीसाठी हजारो कोटी खर्च होत आहेत. या कामामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्राच्या शेतकर्यांना देखील डबल इंजिन सरकारचा लाभ होत आहे. पी एम किसान योजनेसोबत राज्याचे देखील सहा हजार मिळत असल्याने शेतकर्यांच्या खात्यात १२ हजारांची मदत जात आहे. महायुती सरकारने ही रक्कम १५ हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा केली असून याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. केंद्र सरकारने केलेल्या शेतकर्यांच्या कामाने काँग्रेसने केलेले खड्डे भरण्यास मदत झाली. शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जात आहेत, शेतमाल खरेदी केली जात आहे, एम.एस.पी.वाढवली आहे. शेतकर्यांबाबत देश समृद्ध होण्याचा आमचा संकल्प आहे असं मोदी म्हणाले.
काँग्रेसनं दलित-आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केले
भाजपाने नेहमीच सबका साथ, सबका विकास डोळ्यासमोर ठेवून काम केले. आदिवासी समाजाचे देशाच्या स्वातंत्र्यात, विकासात महत्त्वाचे योगदान आहे. काँग्रेसने मात्र याकडे नेहमी दुर्लक्ष केले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारने पहिल्यांदा आदिवासी खाते दिले. आदिवासी परंपरेची ओळख देण्यासाठी प्रयत्न केले. बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी होईल. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केल्या आहेत. भाजपाच्या प्रयत्नातून पहिल्यांदा आदिवासी महिला द्रौपदी मुर्मु देशाच्या राष्ट्रपती झाल्या. काँग्रेसने मात्र त्यांच्या पराभवासाठी शक्ती लावली. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवासाठी देखील ताकद लावली होती. त्याच प्रमाणे द्रौपदी मुर्मू यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले असा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला.