- योगेश पांडे नागपूर - राज्यभरातील विविध मतदारसंघात मतदार यादीबाबत आक्षेप येत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना यावरून चिमटा काढला आहे. मविआ नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव लख्खपणे दिसू लागला आहे. म्हणूनच एरवी ईव्हीएमवर बोलणारे महाविकास आघाडीचे नेते आता मतदार यादीविरोधात बोलू लागले आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसच्या मांडीवर बसल्यापासून उबाठा नेते स्वत:चा सोडून काँग्रेसचाच अजेंडा राबवत आहेत. प्रशासनाच्या जागरूकतेने मतदार वाढल्यामुळे अंगाचा तिळपापड झालेला दिसतो. महायुतीकडून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मात्र विरोधक मतदार यादीवरून ओरडा करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यासाठी काँग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले होते याचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नावे मोठया संख्येत गहाळ झाल्याचे उघड झाले होते. महाराष्ट्रात अशा मतदारांची संख्या मोठी होती. ही नावे का गायब झाली? कशी गायब झाली? कुणाच्या आदेशाने गायब झाली? या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. या मुद्द्यांवर भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. व्हा विरोधक का गप्प होते असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.