घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 08:43 AM2024-10-30T08:43:11+5:302024-10-30T08:43:56+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : कन्हेरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मंगळवारी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.
Maharashtra Assembly Election 2024 : काटेवाडी (बारामती) : मी घर फोडल्याची भाषा काल इथे झाली. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. घर मोडणे हा माझा स्वभाव नाही. पवार कुटुंबातील मी वडीलधारी आहे. नेहमीच मी कुटुंब एकत्र कसे राहील हे पाहिले. माझ्या आई-वडील, भावांनी मला कधी घर फोडायचे पाप शिकवले नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघात केला.
कन्हेरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मंगळवारी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. कुटुंबातील वडीलधारी म्हणून माझ्या कुटुंबात माझे सगळे ऐकतात. मी राजकारण करत असताना अन्य भावांना शेती, उद्योग धद्यांसाठी मदत केली. त्यांच्या आशीर्वादानेच मी आजवर राजकारण करू शकलो. मी राज्य चालवायची जबाबदारी घेत सगळा कारभार त्यांच्या हाती दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मी होतो, मात्र नव्या पिढीकडे सगळे अधिकार दिले. गेली २० वर्षे मी बारामतीत लक्ष घातलेले नाही.
चारवेळा उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली. तरी त्यांनी पहाटे सहालाच तिकडे जात शपथ घेतली. अनेकांना झोपेतून उठवून तिकडे नेले. परिणाम काय झाला, अवघ्या चार दिवसांत पद गेले. नंतरच्या काळात तर पक्षच घेऊन दुसरीकडे जाऊन बसले. त्यातून त्यांना पद मिळाले. पण याआधीसुद्धा मिळाले होतेच ना, असे शरद पवार म्हणाले. मी राज्यात आजवर अनेकांना मंत्री केले. उपमुख्यमंत्री केले. परंतु, एकदाही सुप्रियाला पद दिले नाही. बाकीच्यांना वेगवेगळी पदे दिली. बारामतीत ‘मलिदा गँग’चा वारंवार उल्लेख होतो आहे. पण मी अशा गँग कधीही निर्माण केल्या नाहीत, असा टोलादेखील शरद पवार यांनी यावेळी अजित पवार
यांना लगावला.
नक्कल केली आणि हशा पिकला
सहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची लोकसभेची निवडणूक होती. सुनेत्रा त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. त्यावेळची त्यांची भाषणे बघा.
त्यावेळी, समोरचे लोक भावनेला हात घालतील. तुम्हाला भावनाप्रधान करतील. डोळ्यात पाणी आणून मते द्या म्हणतील, पण तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले होते.
बरोबर ना? पण कालचे भाषण तुम्ही ऐकले का, असे म्हणत शरद पवार यांनी चष्मा काढत डोळ्यावरून रुमाल फिरवित अजित पवार यांची यावेळी नक्कल केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
माझा पक्ष व चिन्ह पळवले
पक्ष मी काढला, चिन्ह माझे होते. काही लोकांनी वेगळा विचार केला. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. ती वेळ त्यांनी आणली. शरद गोविंदराव पवार या नावाने मला पहिल्यांदा समन्स आले. केंद्र त्यांच्या हातात होते.
कोर्टानेही पक्ष व चिन्ह त्या मंडळींचे असल्याचे सांगितले. ही मोठी गमतीची गोष्ट घडली. माझा पक्ष व चिन्ह पळवले. पण जनतेच्या आग्रहाखातर मी पुन्हा जोराने मोट बांधल्याचे पवार म्हणाले.