"काँग्रेसने जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं"; पंतप्रधान मोदींचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 04:12 PM2024-11-08T16:12:31+5:302024-11-08T16:36:06+5:30

PM Narendra Modi : काँग्रेसने वीर सावरकर यांचा सतत अवमान केल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.

Maharashtra Assembly Election 2024 PM Modi challenged that Congress should show appreciation to Balasaheb Thackeray | "काँग्रेसने जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं"; पंतप्रधान मोदींचे आव्हान

"काँग्रेसने जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं"; पंतप्रधान मोदींचे आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. धुळ्यात पहिली सभा घेतल्यानंतर नाशिक येथे पंतप्रधान मोदींनी सभा घेतली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस विकासात राज्याच्या अडचण निर्माण करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं, असं आव्हान देखील पंतप्रधान मोदींनी दिलं आहे. आम्ही दिवस मोजत आहोत असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"जाती जातीत भांडणे लावून सत्ता काबीज करणे हे काँग्रेसचे षडयंत्र आहे. मात्र आता काँग्रेसचे झुट की दुकान महाराष्ट्रात चालणार नाही. काँग्रेस प्रत्येक जातीत फुट पाडण्याचे काम करीत असून ओबीसी समाजावर सतत अन्याय करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. एक हैं तो सेफ हैं हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. एक ओबीसी पंतप्रधान झाला हे काँग्रेसला सहन होत नसून त्याचा राग काँग्रेस ओबीसी समाजावर अन्याय करून काढत आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
"राज्यातील महायुती सरकारने घेतलेले क्रांतिकारी निर्णय राज्याला नवी दिशा देत असून माझी लाडकी बहिण योजनेमुळे महिलांना न्याय मिळालाय. ही योजना सुरू ठेवायची आहे त्यामुळे महायुती सरकारच पुढे ही योजना राबवू शकेल. दुसरीकडे महाविकास आघाडी केवळ भुल थापा मारून वेळ मारून नेतेय. महिला महाविकास आघाडीच्या या कृत्याला माफ करणार नाहीत. आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मात्र त्यांना ही गरज वाटली नाही. त्यांनी कायम याकडे दुर्लक्ष केले. आता मात्र त्यांना या निर्णयाचा त्रास होतो आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"महाराष्ट्राच्या नावावर राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचा हा खरा चेहरा आहे. महायुतीचा जाहीरनामा सर्व घटकाना न्याय देणारा आहे. महाविकास आघाडीचा जाहीरनामा एक घोटाळापत्र असून युतीचा जाहीरनामा विकासपत्र आहे. आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर ते लाडकी बहीण योजना बंद करतील. आम्ही आमच्या कामाचा हिशेब जनतेस देत आहोत. आघाडी सरकार मात्र खोटे बोलून लोकांना फसवत आहे. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलणांना येथे काँग्रेसने हेच काम केले पण नंतर सर्व घोषणा फेल गेल्या. मात्र प्रत्येक गरीबास पक्के घर देण्याचे काम आम्ही करत असून येथे जमलेल्या प्रत्येकाने गरिबांसाठी काम करावे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

"वीर सावरकर आमचे  प्रेरणास्तोत आहे. काँग्रेसने सावरकर यांचा सतत अवमान केला आहे. मात्र राहुल गांधी यांना आघाडीतील नेत्यांनी राज्यात निवडणूक जिंकायची आहे तर सावरकर यांच्याविषयी बोलू नका, असे बजावले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचे योगदान अतुलनीय आहे. पण काँग्रेस नेत्यांच्या तोंडातून बाळासाहेबांच्या कौतुकासाठी एक शब्दही निघत नाही. काँग्रेसला मी आव्हान देतो की त्यांनी आणि त्यांच्या युवराजांनी बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्या विचारधारेचे सार्वजनिकरित्या कौतुक करुन दाखवावे. आज ८ नोव्हेंबर आहे. मी दिवस मोजायला सुरुवात करतो आणि महाविकास आघाडीकडून उत्तराची वाट बघतो. त्यांनी सावरकरांचे आणि बाळासाहेबांचे कौतुक करुन दाखवावं. महाराष्ट्र सुद्धा पाहिल. आम्ही दिवस मोजू आणि तुम्हीसुद्धा मोजा," असं आव्हान पंतप्रधान मोदींनी दिले.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 PM Modi challenged that Congress should show appreciation to Balasaheb Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.