बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:04 PM2024-11-19T12:04:27+5:302024-11-19T12:06:06+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. तर दुसरीकडे बारामतीमध्ये सुद्धा सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली.
Maharashtra Assembly Election 2024 : बारामती : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदानाच्या अगोदरच राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. तर दुसरीकडे बारामतीमध्ये सुद्धा सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली.
राज्यातील सर्वात मोठी हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे याठिकाणी विधानसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. अशातच सोमवारी (दि.१९) रात्री युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली. अजित पवार यांचे बंधू आणि युगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्सच्या बारामती शोरूममध्ये रात्री पोलिसांची शोध मोहीम राबविली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री श्रीनिवास पवार यंच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबविली. रात्री पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या शोरुममध्ये काय सापडलं, नेमकं कोणत्या कारणाने ही शोध मोहीम राबवण्यात आली, याची माहिती समोर आली नाही. मात्र, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले युगेंद्र पवार?
याबाबत युगेंद्र पवार म्हणाले की, रात्री १० वाजण्याच्या सुमारास शो रुम ऑफिसमधून फोन आला. त्यावेळी आपल्याकडे पोलिसांचे एक पथक आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मी पोलिसांना सहकार्य करण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांना दिली. आम्ही काहीच चुकीचं करत नव्हतो, त्यामुळे पोलिसांना काहीच सापडलं नाही. मात्र, बारामतीचे राजकारण या पातळीवर आले असेल तर दुर्देव आहे.
काय म्हणाले निवडणूक निर्णय अधिकारी?
बारामती येथील शरयू शोरूमवर रात्री शोध मोहीम राबवण्यात आली. या संदर्भात बारामती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी माहिती देताना सांगितले की, यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानुसार, आम्ही या ठिकाणी शोध मोहीम राबवली. तसेच, या परिसरात कुठल्याही प्रकारची रक्कम आढळून आली नाही, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.