जळगाव - जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनावणे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव येथून चोपडा येथे मतदारसंघात प्रचार करण्यासाठी जात असताना त्यांना वाहनात हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांची तपासणी केली असताना हृदयाला २ ब्लॉकेज असल्याचं समोर आले.
सध्या प्रभाकर सोनावणे यांच्यावर अँन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिती असून त्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांसह कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. प्रभाकर सोनावणे हे ठाकरे गटाचे चोपडा मतदारसंघातील उमेदवार आहेत. या मतदारसंघात ठाकरेंनी राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्यादिवशी भाजपातून ठाकरे गटात आलेले प्रभाकर सोनावणे यांना उमेदवारी दिली. ठाकरे गटाने इथं उमेदवार बदलल्यामुळे जिल्ह्यात चर्चा रंगली होती.
गुरुवारी सकाळी नेहमी प्रमाणे प्रभाकर सोनावणे चोपडा मतदारसंघात प्रचारासाठी चालले होते. त्यावेळी ममुराबाद इथं त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर जवळच्या खासगी रुग्णालयात प्रभाकर सोनावणे यांना नेले, तिथे त्यांच्या हृदयाला २ ब्लॉकेज असल्याचं समोर आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी यशस्वीपणे अँजिओप्लास्टी केली आहे. सध्या प्रभाकर सोनावणे यांची प्रकृती स्थिर असून येत्या ३-४ दिवसांत ते प्रचारात सक्रीय होतील अशी माहिती त्यांचे पुत्र दिनेश सोनावणे यांनी दिली.
सोनावणेविरुद्ध सोनावणे लढत
चोपडा मतदारसंघात विद्यमान आमदार लता सोनावणे या शिवसेनेच्या आमदार होत्या मात्र शिंदेंनी बंड केल्यानंतर लता सोनावणे या एकनाथ शिंदेंसोबत गेल्या. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरेंना उमेदवार शोधावे लागले. महायुतीने या मतदारसंघात लता सोनावणे यांचे पती चंद्रकांत सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरेंनी प्रभाकर सोनावणे यांना रिंगणात उतरवलं आहे.