नाना पटोले यांच्या गडावर प्रफुल्ल पटेलांची मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 10:05 AM2024-11-07T10:05:13+5:302024-11-07T10:06:18+5:30
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोली मतदारसंघात घेरण्यासाठी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोर्चेबांधणी केली आहे. भाजपच्या तिकीटावर उमेदवार देऊन राजकीय सारिपाटावरची त्यांची पहिली खेळी यशस्वी झाली.
- गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोली मतदारसंघात घेरण्यासाठी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोर्चेबांधणी केली आहे. भाजपच्या तिकीटावर उमेदवार देऊन राजकीय सारिपाटावरची त्यांची पहिली खेळी यशस्वी झाली. पुढच्या १३ दिवसात येथे नेमके काय घडणार, हे आता महत्वाचे आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवित अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरविले. त्यांच्या पाठीशी महायुतीची ताकद उभी करून पटोले यांना मतदारसंघातच गुंतवून ठेवण्याची रणनिती आहे. असे असले तरी महायुतीमधील सोमदत्त करंजेकर यांची बंडखोरी पटोलेंना किती फायद्याची ठरणार, हे महत्वाचे आहे. राजकीय विरोधक असलेले सेवक वाघाये यांना तुमसरच्या मैदानावर पाठवून पटोले यांनी स्वत:चा मार्ग मोकळा केला असला तरी, विकासाच्या प्रश्नावर त्यांना विरोधकांकडून घेरले जात आहे.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
दीड दशकापासून रखडलेला भेल प्रकल्प (ता.साकोली). मतदारसंघातील उद्योगधंद्यांचा अभाव आणि वाढलेली बेरोजगारी.
३० वर्षांपासून महत्त्वाकांक्षी भीमलकसा सिंचन प्रकल्प, निम्न चुलबंद प्रकल्प प्रलंबित. परिणामत: सिंचनाचे भंगले स्वप्न.
लाखांदूर आणि लाखनी दोन्ही तालुक्यांची उद्योगधंद्यांच्या बाबतीत पीछेहाट. नव्या प्रकल्पाची उभारणी नाही.
धानाचे विक्रमी उत्पादन होऊनही प्रक्रिया उद्योग नाही. मतदारसंघात ४५० पेक्षा अधिक तलाव असूनही सिंचन क्षमता कमी. पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाकडे प्रचंड दुर्लक्ष. उच्च शिक्षणाच्या सोयींचा अभाव.