पनवेल - महाराष्ट्राचा विकास हेच भाजपा- महायुतीचं प्राधान्य आहे. मागील काँग्रेस सरकारने जी कामे अशक्य म्हटली ती आम्ही पूर्ण केली. रायगड, पालघर, पनवेल इथं ब्ल्यू इकोनॉमीला चालना देत लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पनवेल येथील जाहीर सभेत केले.
प्रशांत ठाकूर यांच्या सभेत नरेंद्र मोदी म्हणाले की, मुंबईत आज अटल सेतू बनला. रायगडहून मुंबईला जाणे पूर्वीपेक्षा सुलभ झाले. नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टर हायवे, मुंबई पनवेल रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण यासारख्या कामांमुळे महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. रायगड विकासाची नवी व्याख्या लिहितोय. आशियातील दुसरा सर्वात मोठा डेटा पार्क बनतोय. AI केंद्र रायगड बनणार आहे. पनवेलमध्ये सेमी कंडेक्टर क्षेत्रात मोठी गुंतवणूक येतेय. पालघर, जेएनपीटी पोर्टने विकासाचे नवीन मार्ग उघडणार आहे. पनवेल, रायगड, पालघर हे क्षेत्र भविष्यात नवीन केंद्र असतील. त्यातून राज्यातील लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होतील. विकसित भारताचं प्रमुख इंजिन महाराष्ट्र बनेल. हा संपूर्ण परिसर समुद्र किनारी आहे. कोस्टल इकोनॉमीवर सरकार काम करत आहेत असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय कोकणात ३ नवे बंदर विकसित होत आहेत. ब्ल्यू इकोनॉमीला चालना दिली जाईल. आज भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे नवे रेकॉर्ड बनवत आहे. आज देशात महिलांना पुढे नेण्यासाठी सरकार महिला सशक्तीकरणाचं धोरण अवलंबत आहे. आमच्या सरकारने पीएम आवास योजना आणली. या घरांची नोंदणी घरातील महिलेच्या नावावर व्हावी असं धोरण आम्ही आणले. आज आम्ही देशात घरोघरी शौचालय उभारली, काँग्रेसने त्याची खिल्ली उडवली. परंतु महिला सन्मानासाठी ही योजना आम्ही आणली. ३ कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याच्या योजनेवर आम्ही काम करतोय. इतक्यावर न थांबता प्रत्येक वर्षी महिलांचं आर्थिक उत्पन्न १ लाखाहून अधिक बनवण्याचं माझं स्वप्न आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार महिलांना दुप्पट लाभ देत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली परंतु काँग्रेस आणि आघाडीवाले बहिणींना मिळणाऱ्या योजनेचा विरोध करत आहेत. यांचे लोक ही योजना थांबवण्यासाठी कोर्टापर्यंत गेले. आघाडीवाल्यांचा हेतू किती धोकादायक आहे याचा विचार करा. भविष्यातील महिलांची प्रगती रोखण्याचा आघाडी प्रयत्न करत आहे असा आरोप नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
दरम्यान, आम्ही १२ कोटी गरीबांच्या घरी शौचालय बनवून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. अनेकांच्या घरी नळाद्वारे पाणी पोहचवलं. आज देशातील प्रत्येक नागरिकांचे बँक खाते आहे. यूपीआयमधून पेमेंट करत आहेत. गरीब प्रगती करतोय देशाला पुढे नेतोय. सरकारी योजनेचा सर्वाधिक लाभार्थी वंचित घटक, दलित-आदिवासी समाज आहे. शोषित आणि वंचितांची ताकद महायुती सरकारची धोरणे बनत आहेत. जी कामे १० वर्षात झाली ती याआधीही होऊ शकली असती. पण गरीब पुढे येऊन आपला हक्क मागू नये ही मानसिकता काँग्रेसची होती. आम्ही देशातील ८० कोटी जनतेला दर महिने मोफत रेशन देतो. रायगड जिल्ह्यात १८ लाख कुटुंबाना त्याचा लाभ होतोय. या कामाला कुणाला विरोध असावा का? गरिबाच्या घरात चूल पेटली तर आनंद होणार की नाही..? परंतु काँग्रेसला आनंद होत नाही. गरिबी रेषेतून २५ कोटी बाहेर निघालेत त्यांना मोफत रेशन का दिले जाते असं काँग्रेस विचारते. जर महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते महाराष्ट्रात बंद करतील असा दावाही मोदींनी केला.
काँग्रेस जातीजातीत फूट पाडतंय
काँग्रेसचं सत्य देशातील जनतेला माहिती पडले आहे. त्यामुळे बहुतांश राज्यात काँग्रेसचं अस्तित्व धोक्यात आले आहे. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस काहीही करू शकते. त्यामुळे समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम काँग्रेस करत आहे. एससी, एसटी, ओबीसी मजबूत होणे, ते पुढे जाण्याने काँग्रेसचा संताप होता. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय जे आज एकत्र आलेत, ते जातीजातीत विखुरण्याचं काम करतायेत, ओबीसी, एसटी, एससी कमकुवत व्हावी यादृष्टीने काँग्रेस काम करत आहे असा आरोप पंतप्रधानांनी केला आहे.