ठाकरे गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या रामटेकमध्ये मविआत बंडखोरी, काँग्रेसचे राजेंद्र मुळक आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 09:45 AM2024-10-29T09:45:55+5:302024-10-29T09:46:58+5:30
Maharashtra Assembly Election 2024: रामटेकच्या जागेची अदलाबदली करण्याबाबत उद्धव ठाकरेंसोबतचे काँग्रेसचे सर्व प्रयत्न अपयशी ठररल्यानंतर रामटेकमध्ये सांगली पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता असून, येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचे राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) हे आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विदर्भात शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या नागपूरमधील रामटेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. रामटेकच्या जागेची अदलाबदली करण्याबाबत उद्धव ठाकरेंसोबतचे काँग्रेसचे सर्व प्रयत्न अपयशी ठररल्यानंतर रामटेकमध्ये सांगली पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता असून, येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचेराजेंद्र मुळक हे आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विदर्भातील अनेक जागांवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये तिढा निर्माण झाला होता. त्यात नागपूरमधील रामटेकची जागा ठाकरे गटाकडे गेल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघ मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने येथून विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यामुळे येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले राजेंद्र मुळक हे नाराज झाले होते. त्यानंतर रामटेक विधानसभा मतदारसंघाऐवजी अन्य मतदारसंघाची अदलाबदली करण्याचा किंवा मुळक यांना ठाकरे गटातून लढवण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. राजेंद्र मुळक यांनीही उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या वाटाघाटी यशस्वी ठरल्या नाहीत. त्यामुळे अखेर राजेंद्र मुळक यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, रामटेकमध्ये आशिष जयस्वाल हे विद्यमान आमदार असून, २०१९ मध्ये अपक्ष निवडून आलेल्या जयस्वाल यांना यावेळी भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे विशाल बरबटे आणि काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचं मुख्य आव्हान असण्याची शक्यता आहे. आशिष जयस्वाल यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांचा २४ हजार ४१३ मतांनी पराभव केला होता. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून काँग्रेसच्या उमेदवाराला पावणे पाच हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे येथे महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत होतं. मात्र आता बंडखोरीमुळे येथील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.