- बापू सोळुंकेछत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा शिंदेसेना विरूद्ध उद्धवसेना असा सामना होत आहे. चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या आ. संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे यांना उभे करून उद्धवसेनेने आव्हान दिले आहे.
मागील तीन टर्म संजय शिरसाट या मतदारसंघात जिंकत आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत येथे थेट दुरंगी लढत होत आहे. गेल्यावेळी भाजपचे बंडखोर आणि अपक्ष असलेले राजू शिंदे यांना यंदा उद्धवसेनेने मैदानात उतरविले आहे. शिंदेसेनेने शिरसाट यांनाच पुन्हा रिंगणात उतरविले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आ. शिरसाट हे अग्रभागी असतात. यामुळे उद्धवसेनेतील नेत्यांच्या ते हिटलिस्टवर आहेत. कामाच्या जोरावर आपण लढत असल्याचे शिरसाट सांगतात. दुसरीकडे मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादीने येथे उमेदवार दिला नाही आणि बंडखोरीही होऊ दिली नाही. याचा लाभ शिंदे यांना कितपत होईल, हे निकालानंतरच दिसेल.
निवडणुकीतील कळीचे मुद्देमागील अडीच वर्षांच्या कालावधीत मतदारसंघात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावर संजय शिरसाट निवडणूक लढवित आहेत.शिरसाट हे अनिवासी छत्रपती संभाजीनगरकर असल्याचा मुद्दा उद्धवसेना उपस्थित करीत आहेत. ते व्हिजिटींग आमदार म्हणून केवळ शनिवार, रविवार शहरात येतात आणि उर्वरित दिवस मुंबईत राहतात, असा आरोप आहे.शिरसाट यांच्या प्रचारातून भाजपने अंग काढून घेतल्याचे चित्र आहे. दुसरीकडे उद्धवसेनेच्या राजू शिंदे यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचे भक्कम पाठबळ मिळत आहे.२०१९ मध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या ‘एमआयएम’ चा यंदा उमेदवार नाही. त्यामुळे मुस्लीम मतदार महाविकास आघाडीकडे वळतील का, हा मुद्दाही कळीचा आहे.