विजयानंतर चित्र बदलले, अजित पवार गटात पक्षप्रवेशासाठी रांग, या पराभूत उमेदवारांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:49 PM2024-12-02T12:49:44+5:302024-12-02T12:51:18+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीनंतर विधानसभेत मिळालेल्या या बंपर यशामुळे अजित पवार यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास वाढलेला दिसत आहे. तसेच आता अजित पवार गटात जोरदार इनकमिंग होण्याची शक्यता दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही दणदणीत विजय मिळवला होता. काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं कडवं आव्हान परतवून लावत अजित पवार गटाने ४१ जागंवर विजय मिळवला. तर शरद पवार गटाला केवळ १० जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीनंतर विधानसभेत मिळालेल्या या बंपर यशामुळे अजित पवार यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास वाढलेला दिसत आहे. तसेच आता अजित पवार गटात जोरदार इनकमिंग होण्याची शक्यता दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर शरद पवार गटासह महाविकास आघाडीतील इतर पक्षांमधून नेतेमंडळी अजित पवार गटात येण्यास इच्छूक असल्याचं दिसत आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करून निवडणूक लढवणारे शरद पवार गटातील नेते राहुल जगताप यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली होती. तसेच राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर ते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.
शरद पवार गटाप्रमाणेच शिवसेना ठाकरे गटालाही धक्का देण्याची तयारी अजित पवार यांनी केली आहे. ठाकरे गटातील माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. तसेच ते लवकरच अजित पवार गटात प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने १० पैकी ८ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत ४१ जागा जिंकून अजित पवार यांनीही आपल्यामागे जनाधार असल्याच सिद्ध केलं आहे. तसेच राज्यातील सत्तेतही महत्त्वाचा वाटा मिळणार असल्याने पुढच्या काही काळात अजित पवार गटाचं पारडं आणखी जड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.