मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:34 AM2024-11-26T11:34:43+5:302024-11-26T11:35:42+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटींनंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड करण्याचा निर्णय दिल्लीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं होतं. त्यानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र भाजपाच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मागणी आग्रहीपणे करण्यात येत होती. अखेरीस बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटींनंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड करण्याचा निर्णय दिल्लीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचं वृत्त दिलं असलं तरी याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी २०१४ ते २०१९ या काळात सलग पाच वर्षे राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीने दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले होते. दरम्यान, आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
मिळत असलेल्या माहितीनुसार नव्या मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे १० आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. तर शिवसेना शिंदे गटाचे ६ आणि अजित पवार गटाचे ४ मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या होत्या. तर छोटे पक्ष आणि अपक्ष अशा पाच आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. त्याशिवाय शिवसेना शिंदे गटाने ५७ आणि अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या होत्या.
दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्याबरोबरच १४वी विधानसभा विसर्जित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर राज्यपालांनी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्याची सूचना दिली आहे.