महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे विरोधी पक्षांच्या दृष्टीने कमालीचे धक्कादायक लागले आहेत. त्यात विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांची अनपेक्षित अशी घसरगुंडी उडाली. तसेच अनेक मतदारसंघांमध्ये बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. आता यापैकी अनेक पराभूत उमेदवारांकडून निकालाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच त्यातील २४ पराभूत उमेदवारांनी इव्हीएमवर संशय घेत पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. फेरमतमोजणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे राजन विचारे आदी मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांबरोबरच भाजपाचे राम शिंदे यांनीही फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे.
निकालांबाबत संशय व्यक्त करत इव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात, पुणे कॉन्टोन्मेंटमधील काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे, शरद पवार गटाचे नगर शहरमधील उमेदवार अभिषेक कळमकर, भाजपाचे कर्जत जामखेडमधील उमेदवार राम शिंदे, शरद पवार गटाच्या पारनेरच्या उमेदवार राणी लंके, शरद पवार गटाचे राहुरीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे.
याशिवाय शरद पवार गटाचे कोपरगावचे उमेदवार संदीप वर्पे, विक्रमगडमधील उमेदवार सुनील भुसारा, हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, शिरूरचे उमेदवार अशोक पवार, खडकवासल्याचे उमेदवार सचिन दोडके आणि चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांचाही इव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेल्या पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे.
शरद पवार गटाकडून आणखी काही पराभूत उमेदवारांनी इव्हीएमच्या पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यामध्ये तुमसरचे चरण वाघमारे, धाराशिवचे राहुल मोटे आणि अणुशक्तीनगरचे फहाद अहमद यांचा समावेश आहे. इव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या ठाकरे गटाच्याही काही उमेदवारांनी इव्हीएमविरोधात आक्रमक पवित्रा घेत फेरतपासणीसाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये कोपरी पाचपाखाडीचे केदार दिघे, ठाणे शहरमधील उमेदवार राजन विचारे, ओवळा माजिवड्याचे नरेश मणेरा, डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे, ऐरोलीचे एम. के. मढवी आणि राजापूरचे राजन साळवी यांचा समावेश आहे. तर बहुजन विकास आघाडीचे वसईतील उमेदवार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्यातील क्षीतिज ठाकूर आणि बोईसरचे राजेश पाटील यांनीही इव्हीएमच्या पडताळणीसाठी अर्ज केला आहे.