विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन त्यामध्ये महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र भाजपा आणि शिवसेना शिंदे गट अशा दोघांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याने महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे. त्यात भाजपाकडून दिल्लीमध्ये पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी ३ वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.
नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. २८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला २३५ हून अधिक जागांवर विजय मिळाला आहे. त्यात भाजपाला सर्वाधिक १३२, शिवसेना शिंदे गटाला ५७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजपाला छोटे पक्ष आणि अपक्षांनी पाठिंबा दिल्याने भाजपा बहुमताजवळ पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार की भाजपा मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान, निकालांनंतर शिवसेना शिंदे गटातील अनेक नेत्यांकडून राज्याचं मुख्यमंत्रिपद हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडेच सोपवावं, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र दुसरीकडे भाजपाचे कार्यकर्ते, नेते आणि वरिष्ठ पक्षश्रेष्ठी हे यावेळी राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही आहेत. तसेच भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचंही सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमधून कोणता निर्णय जाहीर करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.