विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांना मोठा धक्का बसला आहे. तसेच त्या पराभवाची कारणमीमांसा ही महाविकास आघाडीतील नेते आणि घटक पक्षांकडून सुरू आहे. दरम्यान, पुढील निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याबाबतचा सूर काल झालेल्या ठाकरे गटाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या बैठकीत उमटला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये पुढील निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याबाबत सुरू झालेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, या बातम्या निराधार आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवली होती. तसेच आम्हाला चांगलं यश मिळालं होतं. ३० हून अधिक जागा जिंकणं ही मोठी गोष्ट होती. तेव्हाही आम्ही महाविकास आघाडीतून लढलो होतो. तसेच तेव्हा आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे, असं कुणाचं म्हणणं नव्हतं. विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर जर कुणी असं म्हणत असेल तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते. जे उमेदवार पराभूत झाले, ते आम्हाला काही फायदा झाला नाही, असं म्हणू शकतात, असे संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार का? असं विचारलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, या निवडणुकांना वेळ आहे. तेव्हा विचार करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका या वेगवेगळ्या असतात, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.
ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत ज्या प्रकारे इव्हीएमचा घोटाळा समोर आला आहे. ज्या प्रकारे पैशांचा वापर झाला आहे. तर त्यामुळे महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाही त्याचा फटका बसला आहे. आम्हालाही बसला आहे. त्यावर आम्हा तिघांनाही एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे. आता आमच्यासमोर मुंबई महानगर पालिका आणि राज्यातील पुणे, नाशिकसारख्या १४ महानगरपालिका निवडणुकांचं आव्हान आहे. त्यात मुंबई महानगर पालिका हे सर्वात मोठं आव्हान आहे. आम्ही त्याबाबत विचार करत आहोत, असेही ते म्हणाले.