"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 04:36 PM2024-11-28T16:36:19+5:302024-11-28T16:37:03+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: एकूण मतदानामध्ये ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी आणि नेत्यांनी इव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. तसेच मतदान प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी मतांची आकडेवारी देत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावार चिन्ह उपस्थित केले, ते पुढे म्हणाले की, मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदारकेंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर CCTV लावले होते, त्याचे चित्रिकरण दाखवावे, असे आव्हान नाना पटोले यांनी दिले.
मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते, यावेळी आयोगाने पत्रकार परिषद का घेतली नाही. वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.