नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी महायुतीला बंपर बहुमत मिळालं आहे. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीसह इतर पक्षांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून पुन्हा एकदा इव्हीएमविरोधात शंका उपस्थित केली जात आहे. त्यात आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही इव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांना या विधानसभा निवडणुकीत महायुतीने फसवल्याचा तसेच इव्हीएममुळेच महायुतीचा विजय झाल्याचा दावा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
अविनाश जाधव विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून काही व्हिडीओ येत आहेत. ते पाहिले तर तुम्हाला कशा प्रकारे निकाल तयार करण्यात आले हे लक्षात येईल. आम्हाला एवढा वाईट निकाल लागेल, याची अपेक्षा नव्हती. हा निकाल आम्हाला मान्यच नाही आहे. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी कोरोना काळात खूप काम केलं होतं. मात्र मागच्या दहा वर्षांपासून कुठेही न गेलेले आमदार लाख लाख मतांनी निवडून येतात, हे अशक्य आहे, अनाकलनीय आहे आणि मी खात्रीने सांगतो की, इव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती. या निकालंमध्ये ईव्हीएमची खूप मोठी भूमिका आहे, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.
यावेळी महायुतीच्या नेत्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना फसवल्याचा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे हे विधानसभेच्या निकालांबाबत राज ठाकरे हे आपली भूमिका लवकच मांडतील. मात्र कार्यकर्ते म्हणून विचाराल तर अनेक मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांबाबत नाराजी होती. लोक ती नाराजी बोलून दाखवत होते, असं असतानाही लोकांनी भाजपाला मत दिलं असं वाटत असेल तर ती बाब खोटी आहे. राज ठाकरे यांनी परवा झालेल्या बैठकीत उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. आता ते लवकरच आपली भूमिका मांडतील. तसेच त्यामधून महाराष्ट्रात काय घडलं, याची माहिती सर्वांना मिळेल, असेही अविनाश जाधव यांनी सांगितले.