नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यातील विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीसाठी कमालीचे धक्कादायक असे ठरले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांना एकत्रिपणे मिळून ५० जागाही जिंकता आलेल्या नाहीत. त्यातच एकेकाळी राज्यावर निर्विवाद सत्ता राखणाऱ्या काँग्रेसची जबरदस्त पीछेहाट झाली असून, काँग्रेसला केवळ १६ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याची माहिती आता आकडेवारीमधून समोर आली आहे.
या विधानसभा काँग्रेसने नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर, अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम, वाशिममधील रिसोड, नागपूर जिल्ह्यातील उमरेड, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर, भंडारा जिल्ह्यातील साकोली, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, मुंबई उपनगरमधील मालाड पश्चिम, मुंबई शहरमधील धारावी आणि मुंबादेवी, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, लातूर जिल्ह्यातील लातूर शहर आणि सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव अशा मिळून १६ जागा जिंकल्या.
तर धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या २३ जिल्ह्यांत मिळून काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात १३ अधिक एक अपक्ष अशा १४ जागा जिंकून मोठी मुसंडी मारली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीत उडालेल्या घसरगुंडीमुळे काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.