विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला दणदणीत विजय मिळवला असला तरी आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण यावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवावे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद सोपवण्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचंही एकमत झालं असून, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल, असा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल, असा दावा केला आहे.
यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे करताना संजय शिरसाट म्हणाले की, माझ्या मते आमच्या पक्षाकडूनच मुख्यमंत्री झाला पाहिजे. कारण एकनाथ शिंदे यांनी मागच्या अडीच वर्षांत जे काही काम केलं आहे. त्या जोरावरच आम्ही निवडणुकीत उतरलो होतो. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरच निवडणुका लढवल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना आणल्या होत्या, त्या जनतेला आवडल्या होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आणखी वेळ दिला पाहिजे. तसेच त्यांच्याकडून आणखी काम करून घेतलं पाहिजे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले की, जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं तरीही आम्हाला काही अडचण नसेल. जे नाव समोर येईल त्याचं आम्ही स्वागत करू.
तर भाजपाचे नेते विनय सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रिपदावरून कुठलाही वाद नसल्याचे सांगितले. तसेच महायुतीमधील तिन्ही नेते आणि भाजपाचे वरिष्ठ नेते लवकरच मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील जनतेला एक चांगलं आणि भक्कम सरकार मिळणार आहे. तसेच ते भक्कमपणे चालणार आहे, असे ही विनय सहस्रबुद्धे म्हणाले.