परवा लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली. तर विरोधी महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. त्यात महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांची मोठी पिछेहाट झाली होती. शिवसेना ठाकरे गटालाही केवळ २० जागांवरच समाधान मानावे लागले होते. आता या पराभवाचा धक्का पचवून ठाकरे गटाने पुढे वाटचाल करण्यास सुरुवात केली असून, आज झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटातील नवनिर्वाचित आमदारांची बैठक मातोश्रीवर झाली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली आहे. तर भास्कर जाधव यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, आज झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र हितासाठी लढण्याचा निर्धार सर्व आमदारांनी केल्याचं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले.