विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत आला तरी महाराष्ट्रामध्ये नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. महायुतीची सत्ता आल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्रिपदाची इच्छा बाळगून असलेल्या एकनाथ शिंदे यांनी काल आपली दावेदारी मागे घेत मुख्यमंत्रिपदाचा चेंडू मोदी-शाहांच्या कोर्टात टोलवला. मात्र आता भाजपामध्येही मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड करावी यावरून मोठ्या प्रमाणात खल सुरू असून, मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी धक्कातंत्राचा वापर करून वेगळंच नाव समोर आणलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्यातच सरकार हे महायुतीचं असल्याने मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश होईल आणि महत्त्वाचं मानलं जाणारं गृहखातं कुणाला मिळणार याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भाजपामधून मुख्यमंत्रिपदासाठी कुणाचं नाव पुढे केलं जाईल, याबाबत संभ्रम असला तरी एकनाथ शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचं आणि अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं मंत्रिमंडळामध्ये नेतृत्व करतील, हे जवळपास निश्चित आहे, अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे मंत्रिमंडळातील मोठी खाती द्यावी लागणार आहेत. त्यात गृहमंत्रालयासाठी हे दोन्ही नेते इच्छूक असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत भाजपा गृहमंत्रालय एकनाथ शिंदे यांना देणार अजित पवारांकडे जबाबदारी सोपवणार की स्वत:कडे ठेवणार याबाबत उत्सुकता आहे.
महाराष्ट्रामध्ये गृहमंत्रालयाचं असलेलं महत्त्व पाहता भाजपाने २०१४ ते २०१९ या काळात गृहमंत्रालय स्वत:कडेच ठेवलं होतं. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच २०२२ मध्ये पुन्हा सत्ता मिळवल्यानंतरही मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडे सोपवलं तरी, देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपद स्वत:कडेच ठेवलं होतं. त्यामुळे यावेळीही भाजपा मुख्यमंत्रिपदासोबत गृहमंत्रिपदही आपल्याकडेच ठेवण्याची अधिक शक्यता आहे. तसेच भाजपाने गृहमंत्रिपद स्वत:कडे न घेतल्यास ते एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं जाण्याची शक्यता आहे. मात्र या सरकारमध्ये अजित पवार यांच्या पक्षाकडे तिसऱ्या क्रमांकाच्या जागा असल्याने त्यांना गृहमंत्रिपद देऊन भाजपा शिंदे गटाला नाराज करण्याची शक्यता कमी आहे.
सरकारमधील अनुभवाचा विचार केल्यास अजित पवार हे अनुभवाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांचाही योग्य सन्मान राखण्याचं आव्हान भाजपासमोर असेल. अजित पवार हे याआधी तब्बल पाचवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत महायुतीच्या सरकारमध्ये वित्त मंत्रालय हे अजित पवार यांच्याकडे दिलं जाण्याची शक्यता आहे.