Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही राज्यातील सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे, तर ही सत्ता आपल्याकडे खेचून घेण्याचे तेवढेच मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे.
Maharashtra Assembly Election Results
सकाळीच नेतेमंडळी निकालाचा दिवस असल्याने सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झालेले पाहायला मिळत आहेत. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर य़ांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि महायुती १७५ जागा जिंकेल असं म्हटलं आहे. "बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या राज्यात महायुतीचं सरकार यावं ज्यामुळे या राज्यातील जनतेला न्याय मिळेल आणि राज्य प्रगतीपथाकडे वाटचाल करेल अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली आहे" असंही सांगितलं.
भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टचं सांगितलं आहे. आम्ही ही निवडणूक महायुती म्हणून लढत आहोत. युतीमध्ये जे तीन प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे की, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. पण युतीमध्ये जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा हे सत्य असतं की, संपूर्ण निकाल पाहिल्यानंतर जेव्हा युती जो निर्णय घेईल तो सर्वांनीच स्विकारला पाहिजे. माझ्या मते महायुती १७५ जागा जिंकेल असं म्हटलं आहे.
राहुल नार्वेकर, संजय निरुपम, शायना एनसी आणि महेश सावंत यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. तसेच दर्शनानंतर त्यांनी निवडणूक निकालावर आणि विजयावर देखील भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी दर्शन घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी आशीर्वाद मागितले आहेत.