विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. आता महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.
एकनाथ शिंदे यांच्या या विधानानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "जे स्वत:ला शिवसेना समजतात त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील मोदी-शाह यांना दिले असतील तर त्यांनी यापुढे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये" असं म्हटलं आहे.
"जी शिवसेना निवडणूक आयोगाने तुमच्या हातात दिली, त्या संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार मोदी-शाह यांना देत असाल तर बाळासाहेबांचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान असे शब्द त्यांनी न वापरलेले बरे" असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी दोन दिवसात दिल्लीत बैठका झाल्या असून भाजपा मुख्यमंत्रीपद पक्षाकडेच ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, "मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केले. महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही."