ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 03:46 PM2024-10-24T15:46:03+5:302024-10-24T15:47:52+5:30
तुम्ही मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन असं रोहित पाटील म्हणाले.
सांगली - ज्या बारामतीत घड्याळाचा जन्म झाला तिथे लोकसभेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला ४८ हजारांचं मताधिक्य आहे. ज्या माणसानं घड्याळ बनवलं, त्या माणसानं घड्याळाचे सेल काढून टाकलेत त्यामुळे कुणी काळजी करू नका. आज शरद पवारांना आपल्या ताकदीची गरज आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे दाखवतायेत. तो स्वाभिमान टिकवण्यासाठी पुढचे २० दिवस घरात न राहता घरोघरी तुतारी वाजवणारा माणूस पोहचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे असं आवाहन कार्यकर्त्यांना करत रोहित पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित पाटील यांनी मविआकडून उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात माजी खासदार संजयकाका पाटीलअजित पवारांच्या राष्ट्रवादीतून रिंगणात उतरणार आहेत. आज रोहित पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरत जाहीर सभा घेतली. त्या सभेत ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर मी अर्ज भरला आहे. ३०-३५ वर्ष राजकारणात असणारे कुठलेही काम सांगायचं सारखे नाही, त्यात कुठलाही पक्ष तिकिट द्यायला तयार नाही. त्यामुळे आपण घड्याळाकडे जावूया. आबांमुळे या मतदारसंघात घड्याळ रुजलं आहे. थोडीफार मते त्यातून त्यांना मिळतील. तुम्ही मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन, ज्यारितीने आबांनी यांची गुंडगिरी हद्दपार करून दाखवली तसं मी यांची गुंडगिरी हद्दपार करून दाखवेन हा शब्द मी देतो असं त्यांनी म्हटलं.
तसेच २०१९ च्या निवडणुकीत प्रचार करताना ११० कोटी आकडा मला जास्त वाटायचा, पण मविआ सरकार असताना सव्वा २ वर्षात ८५० कोटींची कामे या मतदारसंघात आपण केली आहेत. या मतदारसंघात एमआयडीसी मंजूर करण्याचं काम आम्ही केले. लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात उद्याच्या काळात मविआ सरकार येणार हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. तुम्हाला ८५० कोटी आकडा लहान वाटेल इतकी कामे आम्ही करू. रोहितदादांनी कर्जत जामखेडला ३ हजार कोटींची कामे केली असं आम्हाला ऐकायला मिळालं. पुढच्या काळात कर्जत जामखेडसोबत तासगाव कवठेमहांकाळ नाव त्या यादीत येईल याची खात्री देतो असा विश्वास रोहित पाटील यांनी सभेत व्यक्त केला.
दरम्यान, मी दिल्लीला १७ वेळा गेलो, येणाजाण्याची तिकिटे पुरावा म्हणून काढून ठेवली. नितीन गडकरींना भेटून तासगावचा रिंगरोड मंजूर करून घेतला. इथे रिंगरोडवर कुणी बोलावं याची वाटच मी पाहतोय. या मतदारसंघात एक इंचही जमीन अनधिकृतपणे कुणाच्या नावावर होऊ देणार नाही असा शब्द मी देतो. सर्वसामान्यांना त्रास देणारा अजून जन्माला यायचाय हे पुढच्या ५ वर्षाच्या कारकिर्दीत दाखवून देईन. ज्या ग्रामपंचायतीतून विरोधक कारभार करतात त्यात आजही आबांचा फोटो आहे. आमदार असताना, खासदार असताना तुम्ही तुमच्या १५ वर्षाची कामे सांगायची आणि मी माझ्या ५ वर्षाची कामे सांगायची, खुल्या व्यासपीठावर मी चर्चा करायला तयार आहे असं आव्हान रोहित पाटील यांनी संजयकाका पाटील यांना दिले आहे.